सुप्रिया सुळे यांच्या पायाखालची वाळू घसरली असल्यानेच त्या अशी शिवराळ भाषा वापरत असल्याची टीका भाजपाच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केली आहे. सुप्रिया सुळे या अत्यंत सुसंस्कृत महिला आहेत, त्यांनी जी शिवराळ भाषा वापरली ती योग्य नसल्याचेही रहाटकर म्हणाल्या आहेत.

बारामतीमधून त्यांचा पराभव होणार असल्याचे दिसत असल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी अशी भाषा वापरली असल्याचे व त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे रहाटकर म्हणाल्या. ज्या कुणाला काही समस्या भेडसावत आहेत, त्यांनी त्याबाबत तक्रार करायला हवी असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच सुळे यांनी ज्यांना धमकी दिली त्या राहुल शेवाळेंनीही तक्रार करण्याचा मार्ग स्वीकारायला हवा असा सल्ला त्यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या राहुल शेवाळेंना सुप्रिया सुळेंनी धमकी दिल्याची ऑडिओ टेप व्हायरल झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणाला गंभीर वळण लागल्याचे दिसत आहे. माझी बदनामी कराल तर घरात घुसून ठोकून काढीन, माझ्या नादाला लागू नका असं सांगताना सुप्रिया सुळे या क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहेत. या क्लिपची सत्यता पडताळून बघायला मिळाली नसली तर सुप्रिया सुळेंनी हा आवाज आपला नाहीच असेही सांगितलेले नाही.

सुप्रिया सुळे यांनी याबाबत विरोधकांचं षडयंत्र असल्याचं मत व्यक्त केलं. तर राहुल शेवाळे यांनी आपण या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून ते योग्य तो निर्णय घेतील असे म्हटले आहे. काही वृत्तपत्रांमध्ये शेवाळे यांच्या नावे सुप्रिया सुळे यांची बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध झाल्याचा एक आरोप आहे. तर आपण सुळे यांची बदनामी होईल असं काहीही बोललो नसल्याचं शेवाळे यांचं म्हणणं आहे.