सुरेश म्हात्रे, विश्वनाथ पाटील यांची उमेदवारी मागे

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप युतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात आरोपांच्या फैरी झाडत बंडाची भूमिका घेणारे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतल्याचे सांगितले जात असले तरी, त्यांची माघार कपिल पाटील यांच्या पथ्यावर पडणार की काँग्रेसच्या सुरेश टावरे यांच्या, याबाबत अनिश्चितता आहे.

Union Home Minister Amit Shah will visit Akola on March 5 to review five constituencies in Vidarbha
लाेकसभेच्या तोंडावर अमित शाह विदर्भात, अकोल्यात ५ मार्चला पाच मतदारसंघांवर भाजपचे मंथन; शिंदे गटाच्या मतदारसंघांचा…
Aam Aadmi Party Lok Sabha Elections 2024 candidates
भाजपाच्या विरोधात आम आदमी पार्टीचे चार उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत सोमनाथ भारती?
karnataka
कर्नाटकात राज्यसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडून पाकिस्तान जिंदाबादचे नारे? भाजपाने शेअर केला VIDEO
annie raja
“केरळमधून निवडणूक लढवून राहुल किंवा काँग्रेसला काय फायदा?” सीपीआय वायनाडच्या उमेदवार म्हणाल्या, “मला वाटते…”

दुसरीकडे, काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्याविरोधात बंडखोरी करणारे कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनीही आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. पाटील यांनी आपली राजकीय भूमिका उघड केली नसली तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ते भाजपच्या कपिल पाटील यांना मदत करण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली असली तरी भिवंडी लोकसभा मतदारसंघात मात्र भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात शिवसेनेच्या नेत्यांनी असहकाराची भूमिका घेतली होती. त्यामध्ये शिवसेनेचे स्थानिक नेते सुरेश म्हात्रे हे सर्वात आघाडीवर होते. पाटील आणि म्हात्रे हे दोघे एकमेकांचे हाडवैरी म्हणून ओळखले जातात. यातूनच पाटील यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून म्हात्रे यांनी बंडखोरी केली होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील बंड शमविण्यासाठी बैठका घेतल्या होत्या. त्यानंतरही म्हात्रे यांनी बंडखोरी केल्याने त्यांना पक्षातून तातडीने निलंबित करण्यात आले होते. या कारवाईमुळे म्हात्रे हे निवडणूक लढणार असल्याची चर्चा शहरात सुरू असतानाच शुक्रवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन आश्चर्याचा धक्का दिला. तरी त्यांनी प्रचार करण्याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. यंदाच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारून माजी खासदार सुरेश टावरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली होती. त्यांची बंडखोरी रोखण्यात काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न होतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याने नेत्यांचे प्रयत्न अपयशी ठरले होते. असे असतानाच विश्वनाथ पाटील यांचे बंड थोपवून त्यांना महायुतीकडे वळविण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले आहे.

पक्षातील वरिष्ठ नेते नाराज असल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पक्षाने निलंबित केले असले तरी मी अजूनही शिवसैनिक आहे. तसेच निवडणुकीत कपिल पाटील यांचा प्रचार करायचा किंवा नाही, याबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करेन.

– सुरेश म्हात्रे, निलंबित शिवसेना नेते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याशी झालेल्या चर्चेत कुणबी सेनेला सत्तेत सहयोगी पक्ष म्हणून सहभागी करण्याचे व कुणबी समाजाच्या मागण्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला. महायुतीला पाठिंबा देण्यासंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेतली जाईल.

– विश्वनाथ पाटील, कुणबी सेनेचे प्रमुख