पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ दरम्यान भाजपचा उमेदवार म्हणून नाव जाहीर करण्यात आलेल्या स्वपन दासगुप्त यांनी राज्यसभेतून राजीनामा दिला आहे. अद्याप त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाही. तृणमूल काँग्रेसकडून स्वपन दासगुप्ता यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी संविधानाच्या नियमांचा हवाला देत दासगुप्ता यांना ‘अपात्र’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपा व तृणमूल काँग्रेसाठी तर ही निवडणूक प्रतिष्ठेची झाल्याचे दिसत आहे. दरम्यान आज, तृणमूल व काँग्रेसच्या विरोधानंतरही भाजपाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर करण्यात आलेल्या स्वपन दासगुप्ता यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे.

आणखी वाचा- सुवेंदू अधिकारी यांचा ममतांच्या उमेदवारीवर आक्षेप; ६ फौजदारी खटले लपवल्याचा आरोप

भाजपाने स्वपन दासगुप्ता यांना तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, ज्यावर तृणमूल व काँग्रेसने आक्षेप नोंदवला होता व काही प्रश्न उपस्थित केले होते. या सर्व घडामोडी घडत असताना आज दासगुप्ता यांवनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.

भाजपाने रविवारी आणखी २६ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये स्वपन दासगुप्ता यांच्या नावाचा देखील समावेश होता. यानंतर तृणमूल काँग्रेसची स्वपन दासगुप्ता यांचे राज्यसभेचे सदस्यत्व संपुष्टात आणण्यासाठी विशेष प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू होती. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी घटनेमधील नियमांचा हवाला देत दासगुप्ता यांना अपात्र म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती.