लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व विजय मिळवून देणारे नरेंद्र मोदी ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

राष्ट्रपती भवनातून रविवारी संध्याकाळी या याबाबतची माहिती देण्यात आली. राष्ट्रपती भवनात गुरुवारी, ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता शपथविधी समारंभ होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधानांना आणि मंत्रिमंडळातील त्यांच्या इतर सहकाऱ्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. राष्ट्रपती कोविंद यांनीही ट्वीट करून शपथविधीबद्दल माहिती दिली आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी शनिवारी मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांनी शनिवारी संध्याकाळी राष्ट्रपतींची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केल्यानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी मोदी यांना सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण दिले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या शिष्टमंडळाने शनिवारी सकाळी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींना, भाजप संसदीय पक्षाच्या नेतेपदी मोदी यांची निवड झाल्याचे आणि एनडीएच्या घटक पक्षांचाही त्यांना पाठिंबा असल्याचे पत्र सादर केले. या शिष्टमंडळात प्रकाशसिंग बादल, राजनाथ सिंग, नितीशकुमार, रामविलास पासवान, सुषमा स्वराज, उद्धव ठाकरे, नितीन गडकरी, के. पलानीस्वामी, कॉनराड संगमा आणि नेफ्यू रिओ यांचा समावेश होता.

लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ३०३ जागा जिंकून भाजप १७व्या लोकसभेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपसह एनडीएच्या जागांची संख्या ३५३ आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत भाजपकडे आहे.

पाहुण्याविषयी उत्सुकता

भाजपच्या ऐतिहासिक यशाचे शिल्पकार ठरलेल्या मोदी यांच्या शपथविधी समारंभाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. समारंभासाठी जगभरातील किती आणि कोणते पाहुणे उपस्थित राहतील याबाबतची माहितीही गुप्त ठेवण्यात आली आहे. मोदी यांच्या २०१४च्या शपधविधीसाठी सार्क देशांच्या प्रमुखांना निमंत्रणे पाठवण्यात आली होती. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ शपथविधीला उपस्थित राहिले होते.

घटक पक्षांना किती मंत्रिपदे?  मोदी यांच्यासोबत शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची नावे मात्र गुलदस्त्यात असल्याने त्याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. भाजपला १७ व्या लोकसभेत पूर्ण बहुमत मिळाल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांना किती मंत्रिपदे मिळतात, याकडे सर्वाचे लक्ष आहे.