उमेदवार कोण,  सोमय्या की कोटक ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या ध्येय धोरणानुसार पक्षाचे निष्ठावंत चौकीदार म्हणून काम करताना तमाम शिवसैनिकांचे भाग्यविधाते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या किरीट सोमय्या यांना पक्ष निष्ठा  भोवली. त्यांची उमेदवारी भाजप नेतृत्वाच्या खप्पामर्जीमुळे गेली असली तरी आमच्या विरोधामुळेच सोमय्यांना संधी मिळाली नाही, असा शिवसैनिकांचा दावा आहे.  मात्र सेनेला नकोसे सोमय्याकडेच ईशान्य मुंबई मतदार संघाची जबाबदारी  भाजपने दिल्याने शिवसैनिकांची पुरती गोची झाली आहे.कोटक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापासून प्रचारफेरी, चौकसभा, मतदारांच्या गाठीभेटी अशा सर्वच ठिकाणी सोमय्यांचाच बोलबाला असून किरीट पुढे पुढे नि कोटक मागे मागे असे चित्र मतदार संघात दिसत आहे. यातून शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्यामुळे कोटकांच्या प्रचारापासून दूर दूर राहणाऱ्या शिवसैनिकांना प्रचारात कसे आणायचे असा प्रश्न भाजप आणि सेना नेत्यांनाही सतावू लागला आहे. सोमय्या यांना दूर ठेवायचे तरी कसे हा प्रश्न भाजप नेतृत्वालाही पडला आहे.

आव्हाड साहेब.. कभी तो ठाणे मे आईए

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे ‘ब्ल्यू आईड बॉय‘ अशी ख्याती असलेले ठाण्यातील नेते जितेंद्र आव्हाड यांची पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ठाण्यासोबत कल्याण लोकसभा मतदारसंघांची सारी जबाबदारी आव्हाड हे आपल्या खांद्यावर घेतील,  अशी अपेक्षा उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्तेही बाळगून आहेत. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून आव्हाड आहेत कुठे असा प्रश्न पडण्याजोगी परिस्थिती पक्षाच्या वर्तुळात आहेत. बिहार मधील बहुचर्चित उमेदवार कन्हैय्या कुमार यांच्या प्रचारासाठी ते काही दिवस तळ ठोकून होते. यानंतर  नाशीक, चाळीसगाव, जळगाव अशा विवीध भागात आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सहभागी झाले होते.  पक्षाचे दुसरे नेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईचा डोलारा आपल्या खांद्यावर घेताना ठाणे आणि भाईदरमधील आवश्यक रसद आव्हाडांनी उभी करावी अशा सूचना दिल्याचे सांगितले जाते.  भाजपवर टीका करताना आव्हाड समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होत असतात. कधी कवीता तर कधी विडंबन काव्यातून त्यांनी पंदप्रधानांच्या परदेश दौऱ्यावरही तोंडसुख घेतले आहे. ‘मोदीजी जरा मुद्दे पर आईये..’ ही त्यांनी फेसबुकवर टाकलेली कविता मध्यंतरी चर्चेत आली. याच कवितेचा आधार घेत राष्ट्रवादीच्या एका ठाण्यातील एका नेत्याचेही कवीमन जागृत झाले. त्यानेही आव्हाडांच्या अनुपस्थितीवर खास बैठकीत ‘कन्हैय्या के साथ आप कीतना भी घुमिये..लेकीन चुनाव ठाणे मे भी है..कभी तो उसपर भी बोलीए..आव्हाड साहब कभी तो ठाणे मे भी आईए’ या शब्दात केलेली कविता पक्षाच्या वर्तुळातच व्हायरल होऊ लागली आहे.

आ क डे मो ड

मतदारांची संख्या

१९५१ – १७ कोटी

१९५७ – १९ कोटी

१९६२ – २१ कोटी

१९६७ – २४ कोटी

१९७१ – २७ कोटी

१९७७ – ३२ कोटी

१९८० – ३५ कोटी

१९८४ – ४० कोटी

१९८९ – ४९ कोटी

१९९१ – ५१ कोटी

१९९६ – ५९ कोटी

१९९८ – ६० कोटी

१९९९ – ६१ कोटी

२००४ – ६७ कोटी

२००९ – ७१ कोटी

२०१४ – ८३ कोटी

२०१९ – ९० कोटींपेक्षा अधिक