दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन यांनी ‘मक्कल निधी मय्यम’ या पक्षाची स्थापना करत तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला. लोकसभा निवडणकीसोबतच त्यांच्या पक्षाने तमिळनाडूतील विधानसभेच्या २० रिक्त जागांसाठी देखील निवडणूक लढवली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, तामिळनाडूच्या पोटनिवडणुकीत कमल हासन यांच्या पक्षाची स्पर्धा ‘नोटा’शी होताना दिसत आहे. पपीरेड्डीपट्टी, तिरुवरुर आणि विलतीकुलम या मतदारसंघांमध्ये कमल हासन यांच्या पक्षाला नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहेत.

पोटनिवडणुकीसोबतच लोकसभेसाठीही त्यांचा पक्ष विशेष कामगिरी करताना दिसत नाहीये. कमल हासन यांनी प्रचारादरम्यान ‘नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्व स्तरांमधून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. हा सगळा वाद कुठे शमत नाही तोच हिंदू हा शब्द मुघल आणि परकियांच्या आक्रमणाआधी अस्तित्त्वातच नव्हता असं वक्तव्य केलं होतं.

कमल हासन यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळेही इथली निवडणूक चांगलीच गाजली. पण मतं मिळवण्यात त्यांचा पक्ष अपयशी ठरला असं चित्र पोटनिवडणुकीच्या निकालांमधून दिसतंय.