भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं रांगेत उभं राहत मतदान केलं आहे. विराट कोहलीने सकाळी आपल्या भावासोबत हरियाणातील गुरूग्राम मतदान केंद्रावर मतदान केलं. मतदानानंतर विराट कोहलीनं मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान केल्यानंतर विराट म्हणाला की, ‘ सर्वांनी मतदान करण्यासाठी यायला हवं. मतदान करण्याचे सर्वांना अवाहन करतो.’ रविवारी लोकसभा निवडणुकाच्या सहाव्या टप्प्यात देशातील सहा राज्ये व दिल्ली मिळून ५९ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. हरयाणातील दहा लोकसभा मतदार संघात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान सुरू आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहलीनं मतदान केल्याचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यासोबत मतदान करण्याचे आवाहनही केलं आहे. राष्ट्राच्या निर्मितीसाठी मतदानाचा हक्क बजावणं आपला हक्क आणि आधिकार आहे. जा आणि मतदान करा. असे कॅप्शन विराट कोहलीनं फोटो पोस्ट करताना टाकले आहे.
Voting is your right and responsibility towards nation building. Go vote. @ecisveep #GotInked pic.twitter.com/DVHY1r4WnA
— Virat Kohli (@imVkohli) May 12, 2019
विराट कोहली सकाळी मतदान केंद्रावर पोहचला त्यावेळी मतदारांची संख्या कमी होती. विराट कोहलीच्या पुढे फक्त चार ते पाच जण होते. एका सर्वसामान्य मतदारांप्रमाणे विराट कोहलीनं मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राबाहेर विराट कोहलीला पाहताच चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी विराट कोहलीनं अनेक चाहत्यांसोबत सेल्फीही काढली. काही चाहत्यांना विराट कोहलीने ऑटोग्राफही दिली.
रविवारी उत्तर प्रदेशातील १४, हरयाणातील १०, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, दिल्लीतील ७ व झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान होत आहे. १०.१७ कोटी मतदार मतदानासाठी पात्र असून एकूण ९७९ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुका सुरळीतपणे होण्यासाठी निवडणूक आयोगाने १.१३ लाखांहून अधिक मतदान केंद्रे उभारली आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 12, 2019 1:20 pm