वाढलेल्या टक्क्य़ातून धक्कादायक निकालाचे संकेत

भाजपच्या दृष्टीने प्रारंभीच्या काळात एकतर्फी वाटणाऱ्या लोकसभा निवडणुकीला अखेरच्या क्षणी तिरंगी लढतीचे स्वरूप आल्याने चुरस वाढली. उन्हाचा पारा ४० अंशावर आणि मतदार संघातील आठ पकी सहा तालुके दुष्काळाशी संघर्ष करीत असतानाही मतदानाची वाढलेली टक्केवारी धक्कादायक निकालाचे संकेत देत असून नवीन राजकीय समीकरणाची ही नांदी ठरणार आहे.

सांगली लोकसभेसाठी मिरज, सांगली, जत, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी आणि पलूस-कडेगाव हे सहा विधानसभा मतदार संघ आहेत. या सहा विधानसभा मतदार संघातील १८ लाख ३ हजार मतदारांपकी ६५ टक्के म्हणजे ११ लाख ७६ हजार ९५० मतदान झाले आहे. गेल्या वेळी मोदीलाट आणि प्रस्थापिताविरूध्द असलेल्या सुप्त असंतोषामुळे मतदानाची टक्केवारी वाढली होती. मात्र या निवडणुकीमध्ये कोणतीही लाट नसताना वाढलेले मतदान कोणाला मदत करणारे ठरते यावर आता चर्चा सुरू आहे.

महायुतीतील भाजपाकडून पहिल्या यादीतच विद्यमान खासदार संजय पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. याचा लाभ उठवित भाजपाने सर्वात अगोदर प्रचार यंत्रणा कामाला  लावली होती. खा. पाटील यांनी विरोधकाकडून उमेदवाराचे नाव निश्चित होण्यापूर्वी मतदार संघाचा एक प्रचार दौरा पूर्ण केला होता. भाजपाकडून उमेदवारी दाखल झाली तरी महाआघाडीची उमेदवारी काँग्रेसला की, स्वाभिमानीला हा घोळ संपत नव्हता. आघाडीच्या जागा वाटपात स्वाभिमानीला उमेदवारी निश्चित झाली, मात्र उमेदवारीसाठीही काँग्रेसने मदत केली. वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना स्वाभिमानीच्या चिन्हावर मदानात उतरविले.

दरम्यान, लढत दुरंगी होणार हे स्पष्ट होत असतानाच भाजपमधून बाहेर पडलेले पडळकर यांनी नागपूरला जाऊन बहुजन वंचित आघाडीची उमेदवारी मिळवली. जोरदार शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी अखेरच्या दिवशी आपली उमेदवारी दाखल केली. यामुळे सांगलीच्या मदानात १२ उमेदवार असले तरी खरी लढत ही तिरंगी होणार हे स्पष्ट झाले.

निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ भाजपाने औदुंबरच्या डोहात मतभेद, गटबाजी बुडविल्याचे सांगून प्रचाराचे रान उठविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेच्या निमित्ताने जत आणि सांगली येथे सभा घेतल्या तर, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची तासगावला सभा घेण्यात आली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  प्रचार प्रारंभाशिवाय एक दिवस ‘मॉìनग वॉक’ला हजेरी आणि एकदा धनगर समाजाची एक बठक घेतली. याशिवाय भाजपच्या जिल्ह्य़ातील आमदारांनाही पक्षात कुठलिही गटबाजी न करता उमेदवाराचे काम करण्याची तंबी देण्यात आल्याने पक्ष एकसंघ आणि आश्वस्थ दिसला.

दुसऱ्या बाजूला महाआघाडीचे विशाल पाटील यांनी काँग्रेस अंतर्गत गटबाजीबद्दल जाहीर माफी मागत पक्षांतर्गत विरोधकांची बेरीज करण्याची भूमिका घेतली. झालेल्या चुका मान्य करीत यापुढे असे घडणार नाही अशी ग्वाही देत हिशोब चुकते होणार नाहीत याची दक्षता घेतली. याचा लाभ त्यांना कितपत  होतो हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. दुसऱ्या बाजूला दादा-बापू वाद चार दशकापूर्वीच संपला असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनीही वेगळा विचार केला जाणार नसल्याचा संदेश दिला. याचबरोबर दादा घराण्यातही लोकसभा थोरल्या पातीकडे आणि विधानसभा धाकल्या पातीकडे म्हणजे मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याकडे अशीही वाटणी करण्यात आली. यामुळे कधी नव्हे ती आघाडी  एकसंधपणे सामोरे गेली असेच मानले जात आहे.

दरम्यान पडळकरांच्या माध्यमातून धनगर आणि अन्य छोटय़ा समाजाची मते त्यांच्याकडे वळाली असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. आता हे मतदान नेमके कुणाचे होते यावरून याचा कुणाला फायदा आणि रुणाला फटका बसणार हे उघड होणार आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर मतदानाची वाढलेली टक्केवारी धक्कादायक निकालाचे संकेत देत असून नवीन राजकीय समीकरणाची ही नांदी ठरणार आहे.