News Flash

शिवसेनेच्या नवरात्रोत्सवात ‘आनंदा’चा धक्का!

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात खरी लढत होणार आहे

(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रवादीच्या परांजपेंकडून देवीदर्शन; शिवसेनाप्रमुख, आनंद दिघे यांच्या प्रतिमांनाही वंदन

शिवसेनेच्या वतीने कोपरीतील मैदानात साजऱ्या करण्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवाच्या मंडपात गुरुवारी राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी प्रवेश करून उपस्थित कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या प्रतिमांना वंदन केल्यानंतर देवीची पूजा करून परांजपे प्रचारफेरीला रवाना झाले. पण त्यांच्या दहा मिनिटांच्या या भेटीची चर्चा शिवसेनेच्या मंडपात दिवसभर सुरू होती.

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात खरी लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांचा प्रचार, कार्यकर्ता मेळावे, मतदारांच्या भेटीगाठी जोरात सुरू आहेत. राजन विचारे यांनी गुरुवारी ठाणे पश्चिमेतील टेंभीनाका, चरई, सिव्हिल हॉस्पिटल, पोलीस वसाहत, उथळसर, चंदनवाडी या भागात प्रचारफेरी काढली होती, तर आनंद परांजपे यांनी ठाणे पूर्व म्हणजेच कोपरी परिसरात प्रचार फेरी काढली होती. परांजपे यांची प्रचारफेरी दौलतनगर परिसराकडे जात असतानाच फायर ब्रिगेडजवळील संत तुकाराम मैदानात सुरू असलेल्या शिवसेनेच्या नवरात्रोत्सवाजवळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थांबा घेतला. त्यानंतर परांजपे हे मंडपाकडे   निघाले. नवरात्रोत्सवाचे प्रवेशद्वार असलेल्या स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला वंदन करत ते आत शिरले. त्यांना पाहून मंडपात उपस्थित अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

विरोधी पक्षाचा उमेदवार असल्यामुळे शिवसैनिक त्यांची भेट घेण्यासाठी पुढे आले नाहीत. मात्र, काहीजणांनी लांबूनच नमस्कार केला तर काहींनी त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केले. परांजपे यांनी पुजाऱ्याच्या मदतीने देवीची पूजा केली व दहा मिनिटांत ते प्रचार फेरीला निघून गेले. मात्र, त्यांच्या या भेटीने भांबावलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतील चलबिचल नंतर बराच वेळ टिकून होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 1:21 am

Web Title: thane navratri festival shiv sena chief anand dighe images
Next Stories
1 रामटेकमध्ये मतदारांमध्ये उत्साह; सरासरी ५६ टक्के मतदान
2 उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणुकीचा आढावा
3 रखरखत्या उन्हातही उत्स्फूर्त मतदान
Just Now!
X