दिग्गज राजकीय नेत्यांच्या पुत्रांचा पराभव
नवी दिल्ली : राजकीय क्षेत्रातील दिग्गज अशी ओळख असलेल्या वडिलांकडून मिळालेला राजकीय वारसा लोकसभेच्या या निवडणुकीत पुत्रांसाठी विशेष परिणामकारक ठरला नसल्याची बाब आता समोर आली आहे. मात्र राजकीय दिग्गजांच्या मुलींनी विजय मिळविला आहे.
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचे पुत्र आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठी या पक्षाच्या राजकीय बालेकिल्ल्यातच पराभूत झाले तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव हे जोधपूर मतदारसंघात पराभूत झाले.
राहुल गांधी यांचा भाजपच्या स्मृती इराणी यांनी जवळपास ५५ हजार मतांनी पराभव केला तर वैभव यांचा भाजपचे गजेंद्रसिंह शेखावत यांनी २.७ लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातील गुणा मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत माधवराव शिंदे यांचे पुत्र ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला. भाजपचे संस्थापकीय सदस्य जसवंतसिंह यांचे पुत्र मानवेंद्रसिंह यांचा राजस्थानमधील बारमेर मतदारसंघात ३.२ लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा पुत्र निखिल कुमारस्वामी यांचा मंडय़ा मतदारसंघात १.२५ लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघातून तर तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एम. करुणानिधी यांची कन्या कनिमोळी यांनी थुथुक्कुडी मतदारसंघातून विजय मिळविला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 25, 2019 12:13 am