शिवसेना जिल्हा संघटिक महिला आघाडीने केलेल्या आरोपाला राष्ट्रवादीचे शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘मराठा टायगर्स’ चित्रपट हा कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नावर होता. हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी शिवसैनिकांनी सीमाभागात तो दाखवला जावा यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न झाले होते. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधूनही याचे कौतुक करण्यात आले होते. यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मी स्वतः आभार मानले होते, म्हणून शिवसेनेची ती भूमिका आणि खासदार आढळराव सेनेची ही भूमिका यात तफावत असून संभ्रम निर्माण होत असल्याचं ते म्हणाले.

अमोल कोल्हे म्हणाले, माझ्यावर केलेले आरोप हे हास्यास्पद आहेत. १५ वर्षे खासदार असलेल्या व्यक्तीची निष्क्रियता लपवण्यासाठी तसेच विकास कामांमध्ये आलेले अपयश लपवण्यासाठी हे आरोप केले जात आहेत. माझ्यावर केलेल्या आरोपांमुळे नागरिकांचे प्रश्न सुटणार असतील तर मी याचे उत्तर दिलं असतं, त्यांनी केलेले हे बेजबाबदार विधान आहे.

सोशल मीडियावर जो व्हिडिओ वायरल केला जात आहे. तो मराठा टायगर्स नावाच्या चित्रपटातील आहे. यात कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील प्रश्न मांडण्यात आला आहे. या चित्रपटाचं शिवसेनेच्या मुखपत्रातून कौतुकही झालं आणि आता आढळराव यांची सेना आरोप करत आहे. त्यामुळे खऱ्या शिवसेनेची भूमिका आणि आढळराव सेनेची भूमिका यांच्यात तफावत असून संभ्रम निर्माण करणारी आहे, असा आरोप त्यांनी केला.

२०१७ पासून आज ५०० भाग पूर्ण झालेली स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास ३२७ देशात पोहचवण्याचे काम करीत आहे. मात्र, ती मालिका बंद करावी यासाठी शिवसेनेची शाखा असलेली युवा सेनेच्या लोकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. एकीकडे छत्रपती संभाजी महाराज यांची मालिका बंद पडावी यासाठी प्रयत्न केले जातात आणि दुसरीकडे पन्हाळा गडाचा उल्लेख करता ही दुतोंडी भुमिका आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.