कोलकात्यात मंगळवारी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान ईश्वरचंद विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप करीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह तृणमुलच्या नेत्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर विद्यासागर यांचे फोटो ठेवत निषेध नोंदवला आहे.

समाजसुधारक आणि लेखक ईश्वरचंद्र विद्यासागर हे देशातील मोठे नाव आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या महान योगदानामुळे आणि दातृत्वामुळे बंगाली जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल आदराचे स्थान आहे. मात्र, मंगळवारी कोलकात्यात अमित शाहंच्या रोड शो दरम्यान विद्यासागर कॉलेज परिसरात त्यांच्या पुतळ्याची मोडतोड करण्यात आली होती. ही मोडतोड भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप तृणमुल काँग्रेसने केला आहे. तसेच याचा निषेध म्हणून त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे प्रोफाईल फोटो लावले आहेत. त्याचबरोबर याविरोधात आपण निषेध आंदोलन करणार असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.


तर दुसरीकडे भाजपाने कोलकात्यातील निवडणूक रोड शो दरम्यान झालेल्या या हिंसाचाराला तृणमुल काँग्रेसला जबाबदार धरीत निवडणूक आयोगाकडे ममता बॅनर्जींविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच यावर तत्काळ कार्यवाही करण्याची मागणीही केली आहे.

कोलकात्यात मंगळवारी अमित शाह यांची प्रचार सभा थांबवण्यात आली होती. यावेळी कोलकाता पोलिसांनी कागदपत्रांची मागणी करीत व्यासपीठ हटवण्यास सांगितले होते. त्यानंतर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा दाखला देत रस्त्यांवर लावलेले मोदी-शाह यांचे पोस्टर्स आणि भाजपाचे बॅनर, झेंडे हटवण्यात आले होते. त्यानंतर अमित शाहंच्या रोड शो दरम्यान हिंसाचार झाला होता.