चौकीदार चोर आहे हे आता सुप्रीम कोर्टानेही मान्य केलंय, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. राफेल संबंधीची काही कागदपत्रे लीक झाली होती, यावर सरकारने आक्षेप घेतला होता. मात्र, सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आलेली ही कागदपत्रं मान्य असल्याचे कोर्टाने बुधवारी झालेल्या सुनावणीत म्हटलं. त्यामुळे हा सरकारसाठी मोठा धक्का ठरला आहे. कोर्टाच्या या निर्णयावर राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे. अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, आता सुप्रीम कोर्टानेही मान्य केलं की, राफेल सौद्यात भ्रष्टाचार झाला आहे. दरम्यान, त्यांनी मोदींना या प्रकरणी वाद-विवादासाठी खुले आव्हानही दिले. जर पंतप्रधानांनी केवळ १५ मिनिटं या चर्चेत भाग घेतला तर ते जनतेशी कधीही डोळे वर करुन पाहणार नाहीत, असे ते म्हणाले. सुप्रीम कोर्टानेही हे मान्य केलं आहे की, चौकीदार चोर आहे. राफेल प्रकरणात दोन लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. एक व्यक्ती नरेंद्र मोदी आहे तर दुसरी व्यक्ती अनिल अंबानी असल्याचे राहुल म्हणाले.इतक्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी यावेळी मोदींना खुल्या चर्चेचे आव्हानही देऊन टाकले.

बुधवारी या प्रकरणी निर्णय देताना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने म्हटले की, राफेल प्रकरणी जी नवी कागदपत्रे उजेडात आली आहेत. त्याआधारे या प्रकरणी फेरयाचिकेवर सुनावणी होईल.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकार हल्ला चढवला. काँग्रेसने म्हटले की, या प्रकरणी सत्य समोर येईलच. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील केंद्र सरकारला याप्रकरणी घेरले.