पश्चिम बंगालमध्ये राजकारणाचा दर्जा अत्यंत हीन आणि गलिच्छ आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्या ठिकाणी भाजपाचे खासदार निवडून आले आहेत त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जाईल. याचं महत्त्वाचं कारण आहे तृणमूलची पश्चिम बंगालमध्ये सत्ता आहे त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांना त्रास देण्याचं घाणेरडं राजकारण केलं जाईल असा आरोप भाजपाच्या खासदार रूपा गांगुली यांनी केला आहे. पोलीस प्रशासनावरही ममता सरकारचा वचक आहे. त्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या नेत्यांना नवनिर्वाचित खासदारांना त्रास दिला जाईल असा आरोप रूपा गांगुली यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी आणि त्याआधीही बंगालमध्ये चांगलाच हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारावरून भाजपाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी बंगाल पोलिसांसह तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर आरोप केले होते. तर टीएमसीने यासाठी भाजपाला जबाबदार ठरवले होते. दरम्यान निवडणुकांचे टप्पे सुरू असताना ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याचीही तोडफोड झाली होती. यावरूनही ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगले होते. आता निवडणूक निकालानंतर रूपा गांगुली यांनीही भाजपाच्या खासदारांना जाणीवपूर्वक त्रास दिला जाईल असा आरोप केला आहे. एवढंच नाही तर बंगालमधलं राजकारण अत्यंत गलिच्छ आणि घाणेरडं असल्याचीही प्रतिक्रिया दिली आहे.