मतदारसंघांच्या अदलाबदलीमुळे भाजपला चिंता

केंद्रीय मंत्री मेनका गांधी आणि त्यांचे पुत्र वरुण यांच्या मतदारसंघांमध्ये आदलाबदल करण्यात आल्याने उभयतांना यंदाची निवडणूक कठीण जाणार आहे. यातच भाजप नेतृत्वाने दुर्लक्ष केल्याने नाराज असलेल्या वरुण यांनी प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेण्याचे टाळले आहे. भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी केलेल्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर या दोन्ही जागाजिंकण्यासाठी भाजपला सारी ताकद लावावी लागणार आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत वरुण गांधी सूलतानपुरातून, तर मेनका गांधी पिलभीत मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. यंदा उभयतांच्या मतदारसंघांमध्ये आदलाबदल करण्यात आली आहे. मेनका सुलतानपूरमधून, तर वरुण पिलभीतमधून निवडणूक लढवीत आहेत. वरुण गांधी मध्यल्या काळात भाजप नेतृत्वाच्या मनातून उतरले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री म्हणून आपली उमेदवारी जाहीर करावी, अशी त्यांची इच्छा होती. पण पक्षाध्यक्ष अमित शहा यांना ही मागणी अजिबात पसंत पडली नाही. तेव्हापासून भाजप नेतृत्वाने त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. यंदाची निवडणूक अवघड असल्याची कबुलीच वरुण गांधी यांनी दिली आहे. त्यांना गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत कडवा सामना करावा लागेल अशी चिन्हे आहेत.

वरुण गांधी यांना पिलभीतमधून उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या पचनी पडला नव्हता. पिलभीतमधील पाचपैकी तीन भाजपच्या आमदारांनी वरुण यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. मेनका गांधी यांनी आतापर्यंत सहा वेळा पिलभीत मतदारसंघातून विजय मिळवला आहे. अनेक वर्षे खासदारकी भूषवूनही पिलभीतचा विकास झालेला नाही, असा आक्षेप त्यांच्यावर घेतला जातो. वरुण गांधी प्रचार करताना त्यांची आई मेनका यांचा उल्लेख करतात. पण भाजपच्या अन्य उमेदवारांप्रमाणे ते पंतप्रधान मोदी यांचे नावही प्रचारात घेत नाहीत. पक्षाकडून मिळालेल्या वाईट वागणुकीमुळेच ते सध्या पक्षावर काहीसे नाराज आहेत.

लोकसभेच्या गेल्या सात निवडणुकांपैकी सहा वेळा मेनका गांधी तर एकदा वरुण पिलभीतमधून विजयी झाले होते. वरुण गांधी यांचा सामना समाजवादी पार्टीचे हेमराज वर्मा यांच्याशी आहे. वर्मा इतर मागासवर्गीय समाजातील लोढ समाजाचे असून, या समाजाचे तीन लाख मतदार आहेत. दोन लाख अनुसूचित जातीचे तर सुमारे पाच लाख मुस्लीम मतदार आहेत. वर्मा यांनी वरुण हे उपरे उमेदवार असल्याचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवला आहे.

सुलतानपूरमध्ये वरुण यांना निवडून येणे कठीण जाईल याचा अंदाज आल्यानेच मेनका गांधी यांनीच मतदारसंघांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या नेतृत्वापुढे ठेवला होता. दोन्ही जागाजिंकून आणण्याची जबाबदारी मेनका गांधी यांनी घेतल्यानेच अदलाबदल करण्यात आल्याचे भाजपमध्ये बोलले जाते. सुलतानपूरमधील लढाईसुद्धा मेनका गांधी यांच्यासाठी सोपी नाही. आई आणि पुत्र यांच्यापुढे यंदा निवडून येण्याचे आव्हान आहे. ते पेलण्यावरच उभयतांचे भवितव्य अवलंबून असेल.

अदलाबदल मेनका यांच्यामुळेच?

सुलतानपूरमध्ये वरुण यांना निवडून येणे कठीण जाईल याचा अंदाज आल्याने मनेका गांधी यांनीच मतदारसंघांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव भाजप नेतृत्वापुढे ठेवला होता. तसेच त्यांनी दोन्ही जागाजिंकून आणण्याची जबाबदारी घेतल्यानेच अदलाबदल करण्यात आल्याचे भाजपमध्ये बोलले जाते. सुलतानपूरमधील लढाईसुद्धा मनेका गांधी यांच्यासाठी सोपी नाही.