हर्षद कशाळकर

अनंत गीतेंची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसला

नामसाधर्म्य असलेला उमेदवार निवडणुकीत उतरवून अनंत गीते यांची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसला आहे. अपक्ष उमेदवार अनंत पद्मा गीते यांचा उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरला आहे. दुसऱ्या बाजूला सुनील तटकरे या नावाशी साधम्र्य असलेल्या दोन उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. एकाच वेळी तीन सुनील तटकरे निवडणूक रिंगणात असणार आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत शेकापने सुनील तटकरे यांच्या नावाशी साधम्र्य असेलेला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला होता. त्याला ९ हजार ८३६ मते पडली होती. या डमी उमेदवारामुळे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता. हीच खेळी करून यंदा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनंत गीते यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता. अनंत पद्मा गीते नामक एका उमेदवाराचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्यात आला होता. पण नामनिर्देशन पत्राच्या छाननीत अनंत पद्मा गीते यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला. त्यामुळे अनंत गीते यांची कोंडी करण्याची खेळी फसली.

दुसऱ्या बाजूला अनंत गीते यांच्या नावाशी साधम्र्य असलेल्या उमेदवाराचा अर्ज दाखल झाला असल्याचे समजताच शिवसेना -भाजपच्या गोटातून रातोरात सूत्रे हलविण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी दोन सुनील तटकरे नामक उमेदवारांचे अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून घेतले. याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही अर्ज छाननी दरम्यान वैध ठरले. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यासह आणखीन दोन सुनील तटकरे निवडणूक रिंगणात कायम असणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुनील तटकरेंच्या अडचणी मात्र वाढणार आहेत.

२००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन ए. आर. अंतुले नावाचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचा विजय झाला असला तरी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या डमी अंतुलेंना २३ हजार ७७१ मते पडली होती. १९९६ साली झालेल्या निवडणुकीत दत्ता पाटील नावाचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १९९१ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही दत्ता पाटील नावाच्या दोन उमेदवारांनी निवडणूक लढविली होती.