पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीशी संबंधित हिंसाचाराची एक घटना समोर आली आहे. मुर्शिदाबाद येथे एका व्यक्तीने पत्नीने सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षाला मत न दिल्याने संतापाच्या भरात अॅसिड पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी पतीला त्याच्या नातेवाईकांनीही मदत केली. आरोपी तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीने काँग्रेसला मत दिल्याने आरोपी पती नाराज होता. महिलेला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. महिलेचं नाव अंसुरा बीबी असून प्रकृती अद्याप गंभीर आहे.

मंगळवारी मतदान करुन घरी परतल्यानंतर कुटुंबीयांनी महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली होती. डॉक्टरांनी पुढील 48 तास महिलेला आपल्या देखरेखेखाली ठेवलं आहे. महिलेच्या मुलानेच पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तक्रारीत मुलाने दिलेल्या माहितीनुसार, तोंडात अॅसिड टाकण्याआधी आईला केस पकडून फरफटत नेण्यात आलं आणि निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.