रेल्वे प्रवास सुखकर केला!

श्रीकांत शिंदे, शिवसेना

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात लोकांना उपयुक्त ठरतील अशी कोणती ठळक कामे केलीत?

ल्याण लोकसभा मतदारसंघात १३ रेल्वे स्थानके आहेत. या स्थानकांतून दररोज प्रवास करणाऱ्या दिव्यांग, अपंग आणि वृद्धांना रेल्वे स्थानकातील जिन्यावर चढून पुन्हा फलाटावर जाणे जिकिरीचे होते. ही गैरसोय विचारात घेऊन मागील पाच वर्षांत बहुतांशी रेल्वे स्थानकांमध्ये ५६ सरकते जिने आणि १५ उद्वाहने सुरू केली आहेत. या सुविधेचा लाभ प्रवाशांना होत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ४२८ कोटींच्या कळवा-ऐरोली उन्नात मार्गाला प्राधान्य दिले. उल्हासनगर येथे १०० खाटांचे रुगणालय उभारणीचे काम सुरू आहे. कल्याण ते तळोजा मेट्रो मार्ग मंजुरीसाठी पाठपुरावा केला. स्थानकांमधील तिकिटांच्या रांगा कमी करण्यासाठी १५० एटीव्हीएम यंत्र बसविण्याला प्राधान्य दिले.

मुंबई आणि ठाण्यातील वाहतूक आणि रेल्वे समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहेत?

कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, दिवा या शहरांचे झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. वाढत्या नागरीकरणाबरोबर वाहनांची संख्या वाढत आहे. चाकरमानी, व्यावसायिक वाढत आहेत. हा सगळा भार रस्ते, रेल्वे स्थानकांवर येत आहे. एकाच ठिकाणी होणारी गर्दी विभागून जावी म्हणून कल्याणपर्यंत आलेली मेट्रो खडकपाडा परिसरात वळवून तेथून ती तळोजा (नवी मुंबई) मेट्रोला जोडली जावी यासाठी प्रयत्न केले. त्यासही यश आले आहे. मेट्रोमुळे शिळफाटा रस्त्यावरील कोंडी सुटेल आणि ठाणे रेल्वे स्थानकातून नवी मुंबईला जाणारी गर्दी कमी होईल. प्रवाशांना सुखकर प्रवास करणे शक्य होईल. अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान चिखलोली स्थानक मंजूर करून घेतले. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.

तुम्हालाच लोकांनी मते का द्यावीत?

मी काय विकासकामे केली, हे लोक प्रतिस्पध्र्याना सांगत आहेत. समोरचा उमेदवार किती बलवान हे माझ्यापेक्षा माझे मतदार ओळखून आहेत. गेल्या पाच वर्षांतील संसद अधिवेशनचा काळ सोडला तर उर्वरित कालावधीत मी मतदारसंघात भिंगरीसारखा फिरलो. विकासकामे करताना शहरी, ग्रामीण असा भेद केला नाही. नागरिकांची गरज ओळखून शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही कामे केली. २७ गावांसह अंबरनाथ, बदलापूर ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला. त्यातून ‘कडोंमपा’ला अमृत योजनेतून १५० कोटींचा निधी २७ गाव पाणी योजनेसाठी उपलब्ध झाला. या भागातील रस्ते, उद्याने अशा विकासकामांना प्राधान्य दिले.

पुढील पाच वर्षे कोणती कामे करणार?

निवडून आल्यानंतर कल्याण-शिळफाटा रस्त्याचे रुंदीकरण कामाला प्राधान्य देणार आहे. शिळफाटा दत्तमंदिर चौकात मुंब्रा ते पनवेल मार्गावर उड्डाण पूल उभारणीला प्राधान्य असणार आहे. जिल्हय़ातील जलवाहतूक, ठाकुर्ली टर्मिनस, कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील स्मार्ट सिटी, रिंगरुट अंतर्गत मार्गी लागणारे लोकोपयी प्रकल्प सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न करणार आहे.

शिळफाटय़ाची वाहतूक कोंडी सोडविणार

बाबाजी पाटील, राष्ट्रवादी

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या पाच वर्षांत खासदारांच्या कामगिरीविषयी काय वाटते?

खासदारांनी गेल्या पाच वर्षांत कल्याण लोकसभा मतदारसंघात विकासाची अत्यावश्यक कामे केली नाहीत. हा मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागांत विभागलेला आहे. या दोन्ही भागांतील रहिवाशांच्या नागरी समस्या वेगळ्या आहेत. शहरी आणि ग्रामीण असे नियोजन करून त्या ठिकाणचा विकास करणे आवश्यक होते. परंतु गेल्या पाच वर्षांत तसे काहीच झाले नाही. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावे, नवी मुंबईतून बाहेर काढण्यात आलेली १४ गावे तसेच अंबरनाथ, बदलापूर ग्रामीण पट्टय़ात पाण्याची समस्या गंभीर आहे. या भागात रस्तेही चांगले नाहीत. हे रस्ते पावसाळ्यात चिखलमय होऊन जातात. त्यामुळे नोकरदारवर्ग, भाजीपाला, दूध व्यावसायिक यांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागते. गावातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आसपासच्या शहरांत जातात. त्यांना गाव ते मुख्य रस्त्यापर्यंत रिक्षा आणि खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. रात्रीच्या वेळेत परिवहन सेवेची बस गावात येत नसल्याने रहिवाशांचे हाल होतात. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दत्तमंदिर शिळफाटा, पलावा चौक, काटई चौक या ठिकाणी उड्डाण पूल, पादचारी पूल होणे आवश्यक होते.

मुंबई आणि ठाण्यातील वाहतूक आणि रेल्वे समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहेत?

नगरसेवक म्हणून गेल्या पाच वर्षांत देसई, पडले, आगासन तसेच दिवा प्रभागात २५० कोटींहून अधिक रकमेची विकासकामे केली आहेत. रस्ते विकास आराखडे मंजूर करून घेतले. काही पादचारी, उड्डाण पूल, रस्ते या भागात प्रस्तावित केले आहेत. ती कामे लवकर मार्गी लागतील.

तुम्हालाच लोकांनी मते का द्यावीत?

गेल्या पाच वर्षांत खासदाराने कामांच्या घोषणा केल्या. पण प्रत्यक्षात कृती केली नाही. शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी नेहमी होत आहे. या भागातील जनतेला खासदारांनी काय काम केले आहे हे चांगले माहिती आहे. ते मी सांगण्याची गरज नाही. या भागातील मतदार मतपेटीतून व्यक्त होईलच.

पुढील पाच वर्षे कोणती कामे करणार?

कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, डोंबिवली ते मुंब्रा कळवा परिसरातील रस्ते, पादचारी, उड्डाण पूल ही कामे आपण निवडून आल्यानंतर प्राधान्याने हाती घेऊ. शिळफाटय़ाची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक ठिकाणी पूल उभारले जातील. गावांच्या हद्दीतील पाणीटंचाईचे प्रश्न सोडविण्यासाठी या भागात पाणी योजना राबविण्यात येतील. नेवाळी जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. २७ गाव परिसरातील बांधकाम परवानग्यांचा प्रश्न सोडविणार आहे.