एकीकडे देशामधील करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकींसाठी मतदान आणि प्रचार सुरु आहे. या प्रचारादरम्यान अनेक राजकीय मुद्द्यांवरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असणाऱ्या तृणमूल काँग्रेसने थेट गुजरातमधील परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. तृणमूल काँग्रेसने गुजरातमधील एका सरकारी करोना रुग्णालयातील परिस्थिती दाखवणारा व्हिडीओ शेअर केलाय.

नक्की वाचा >> परदेशातून महाराष्ट्रात लसी आयात करण्याच्या मागणीवर आदित्य ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, “मॅडम आम्ही…”

“या धक्कादायक व्हिडीओमध्ये रुग्णांना श्वास घेण्यासही त्रास होताना दिसत आहे. भावनगरमधील सरकारी रुग्णालयामध्ये रुग्ण जमीनीवर पडून असल्याचा व्हिडीओ गुजरातमधून समोर आलाय. पंतप्रधान आणि गृहमंत्री बंगालमध्ये खोटी आश्वासनं देत असतानाच हा व्हिडीओ समोर आला आहे. जर हे सोनार गुजरात (सुवर्ण काळ असणारं विकसित गुजरात) असेल तर आम्हाला माफ करा आम्हाला सोनार बंगला नकोय,” असा टोला तृणमूलने ट्विटरवरुन लागवला आहे.

नक्की वाचा >> लसीकरणावरुन राज्य विरुद्ध केंद्र सरकार वाद सुरु असतानाच पवार म्हणाले, “कालच केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी…” 

तृणमूलने शेअर केलेल्या व्हिडीओ हा भावनगरमधील करोना सरकारी रुग्णालयातील असल्याचं व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती गुजराती भाषेत सांगताना ऐकू येत आहे. या व्हिडीओमध्ये अनेक रुग्ण तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून रुग्णालयाच्या लॉबीमध्येच झोपून असल्याचे दिसत आहे. काहीजण स्ट्रेचरवर तर काहीजण जमीनीवर चादर टाकून ऑक्सिजन सिलेंडरच्या बाजूला पडून श्वास घेताना दिसत आहेत. व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने इथे अनेकजण बाहेर उभे असून रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी इथे कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याचं सांगत आहे.

नक्की वाचा >> २२ देशांमध्ये करोनाची तिसरी लाट; जागतिक रुग्णसंख्येने ओलांडला १३ कोटी ३० लाखांचा टप्पा

पश्चिम बंगालमध्ये सध्या भाजपा आणि तृणमूलमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडल्या जात आहेत. पश्चिम बंगालला पुन्हा सोनार बंगला म्हणजेच पुन्हा सुवर्णकाळ मिळवून देण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचं आवाहन भाजपाचे नेते करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच गृहमंत्री अमित शाह आणि अनेक केंद्रीय मंत्री पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभा घेताना दिसत आहे. भ्रष्टाचार, हफ्तेखोरी, गुंडगीरी अशा अनेक मुद्द्यांवरुन भाजपाने ममता सरकारवर टीका केलीय. मात्र आता ममतांच्या पक्षाने थेट गुजरात मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा व्हिडीओ शेअर करत भाजपाच्या आश्वासनांसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.