15 October 2019

News Flash

भाजपकडूनच विद्यासागर यांचा पुतळा तोडून हिंसाचार!

कोलकात्यातील रस्त्यांवर दहशत व संताप असून काल जे घडले त्यामुळे बंगालचा स्वाभिमान दुखावला गेला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी तृणमूल काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ कोलकात्यात पदयात्रा काढली.

तृणमूल काँग्रेसचा चित्रफितीसह आरोप

नवी दिल्ली : भाजपच्या गुंडांनीच समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची कोलकात्यातील हिंसाचारावेळी मोडतोड केली असल्याचा दावा करणारी चित्रफीत तृणमूल काँग्रेसने बुधवारी जारी केली असून, निवडणूक आयोगाला या चित्रफिती सादर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत कोलकात्यातील  हिंसाचारात तृणमूलचाच हात असून निवडणूक आयोगाने यात मूक प्रेक्षकाची भूमिका घेतल्याचा आरोप केला होता, त्याला तृणमूलने चित्रफितीच्या आधारे उत्तर दिले आहे.

तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी सांगितले, की चित्रफितीतून भाजपने काय केले हे स्पष्ट झाले असून त्यात अमित शहा खोटारडे असल्याचेही सिद्ध  झाले आहे. कोलकात्यातील रस्त्यांवर दहशत व संताप असून काल जे घडले त्यामुळे बंगालचा स्वाभिमान दुखावला गेला आहे.

पक्षाने एक चित्रफीत व व्हॉट्सअ‍ॅप संदेश दाखवला असून त्यात लोकांना लोखंडी गज व शस्त्रांसह अमित शहा यांच्या प्रचारमोर्चात सहभागी होऊन तृणमूल व पोलिसांचा मुकाबला करण्याचे आवाहन करण्यात आले होते.पश्चिम बंगालमध्ये तैनात केलेल्या केंद्रीय दलांनी लोकांना भाजपला मदत देण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले आहे, असा आरोपही तृणमूल काँग्रेसने केला आहे.

कोण होते विद्यासागर?

ईश्वरचंद्र विद्यासागर (१८२०-१८९१) यांचे मूळ नाव ईश्वरचंद्र बंदोपाध्याय. संस्कृत व्याकरण, वेदांत, तर्कशास्त्र आणि हिंदू शास्त्राचे संपूर्ण ज्ञान वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी प्राप्त केल्याने त्यांना ‘विद्यासागर’ ही पदवी मिळाली. त्यानंतरच्या दहा वर्षांत त्यांनी इंग्रजी साहित्य आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. ते भाषातज्ज्ञही होते. गेली १२५ वर्षे त्यांचीच भाषापुस्तके ही बालशिक्षणात वापरात आहेत. तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, प्रकाशक म्हणूनही त्यांची ख्याती होतीच, पण समाजसुधारक या नात्याने त्यांनी बालविवाह रोखणे आणि विधवा पुनर्विवाहाला वाव देणे, ही त्यांची ऐतिहासिक कामगिरी मानली जाते. बंगालमध्ये स्त्रीस्वातंत्र्य आणि स्त्रीशिक्षणाचा पाया त्यांनी सर्वप्रथम घातला.

First Published on May 16, 2019 3:48 am

Web Title: trinamool submits proof of bjp involvement in vidyasagar statue broken