अमेठी/ रायबरेली : खरा राष्ट्रवाद म्हणजे लोक आणि देशांप्रती असलेले प्रेम होय; मात्र भाजप जे काही करते त्यात त्यांचे प्रेमही किंवा आदर दिसून येत नाही, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी सांगितले.

लोकांचा आवाज एका नेत्याच्या आवाजाने दाबून टाकला, तर त्याचे परिणाम होतील असे सांगून, खऱ्या मुद्यांबाबत बोलत नसल्याबद्दल त्यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला.

देशात लोकांचा राग आणि दु:ख वाढत असून, २३ मे ला लोकसभा निवडणुकीतील मतमोजणी होईल तेव्हा भारताचे लोक मोदी यांना संदेश देतील, असे गांधी यांनी सांगितले.

खरा राष्ट्रवाद म्हणजे लोकांबद्दल आणि देशबद्दल असलेले प्रेम म्हणजेच आदर होय. मात्र भाजप जे काही करते आहे, त्यात लोकांबाबतचा आदर मला दिसत नाही, असे अमेठी व रायबरेली मतदारसंघामध्ये सुरू असलेल्या प्रचारमोहिमेदरम्यान दिलेल्या मुलाखतीत प्रियंका म्हणाल्या. सोनिया गांधी या रायबरेलीचे, तर राहुल गांधी हे अमेठीचे प्रतिनिधित्व करतात.

राष्ट्रवाद म्हणजे देशाच्या लोकांच्या समस्या सोडवणे होय. कुठल्याही सरकारच्या कोणत्याही राजकीय नेत्याचे सगळ्यात मोठ ेदेशप्रेम म्हणजे लोक बोलतील तेव्हा ते ऐकण्यास सक्षम असणे, लोकशाहीवादी असणे आणि लोकांचा आवाज बळकट करणाऱ्या संस्था मजबूत करण्यास- त्यो कमजोर करण्यास नव्हे- सक्षम असणे होय, असे प्रियंका म्हणाल्या.

वाराणसीतून मोदी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत नसल्याबद्दल निराश वाटते काय असे विचारले असता त्या म्हणाल्या, की मला कुणाची भीती वाटत नाही आणि मी पक्षाच्या निर्देशांचे पालन केले.