20 November 2019

News Flash

मतदान टाळण्यासाठी आदल्या दिवशीच बोटाला शाई

चंडौलीत मतदारांना लाच दिल्याचा आरोप

(संग्रहित छायाचित्र)

चंडौलीत मतदारांना लाच दिल्याचा आरोप

उत्तर प्रदेशातील चंडौली मतदारसंघात ताराजीवनपूर गावातील दलित वस्तीत जाऊन भाजप कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्रीच काही मतदारांच्या बोटांना शाई लावून वर ५०० रूपये लाच देत त्यांना मतदान करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याची सप-बसपची तक्रार आहे.

भाजप कार्यकर्ते या वस्तीत गेले व लोकांना तुम्ही कुणाला मतदान करणार असे विचारले. त्यांनी  भाजपला मत देणार नाही, असे सांगितल्यानंतर त्यांच्या बोटाला शाई लावून प्रत्येकी पाचशे रुपये लाच देण्यात आली, असा आरोप आहे. याच्या निषेधार्थ ताराजीवनपूर येथील समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांच्या बोटाला शाई लावून आता तुम्ही मतदान करू शकणार नाही, असे सांगून कुणाला सांगितलेत तर वाईट परिणाम होतील असा इशारा दिला. शनिवारी या खेडय़ात मतदारांना बोटाला शाई लावल्याच्या बदल्यात प्रत्येकी पाचशे रुपये देण्यात आले, असा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी निदर्शकांना याबाबत प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्यास सांगितले. उपविभागीय दंडाधिकारी कुमार हर्ष यांनी सांगितले की, मतदारांच्या बोटाला मतदान न करताच बळजबरीने शाई लावण्यात आली असली तरी ते मतदान करू शकतात, शिवाय जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. भाजपने हे आरोप फेटाळले असून हा विरोधकांनी केलेला बदनामीचा डाव असल्याचा आरोप केला आहे. आम्ही  निवडणूक जिंकत असताना असे कशासाठी करू असा सवाल भाजप प्रवक्ते हरीश श्रीवास्तव यांनी केला. येथे भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांचा मुकाबला आघाडीचे डॉ. संजय चौहान यांच्याशी आहे.

First Published on May 20, 2019 12:27 am

Web Title: trying to avoid voting in up
Just Now!
X