डॉ. बी. एस. पाटील यांच्याविरूद्ध ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा

जळगाव : अमळनेर येथील भाजप-सेना महायुतीच्या मेळाव्यात बुधवारी भाजपचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह सात जणांविरूद्ध पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच डॉ. पाटील यांच्याविरूद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी अमळनेर येथे युतीतर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात आमदार स्मिता वाघ यांचे पती तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांंसह डॉ. पाटील यांना लाथाबुक्कय़ांनी मारहाण केली. स्मिता वाघ यांची लोकसभेची उमेदवारी रद्द झाल्याचा राग मनात ठेवून उदय वाघ यांच्यासह भाजपचे शहर अध्यक्ष शीतल देशमुख, राजेश वाघ, पंकज पवार, संदीप वाघ, देवा लांडगे, एजाज बागवान आदींनी नाकातोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण केल्याचा आरोप डॉ. पाटील यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला. तसेच वाघ यांनी घर उद्ध्वस्त करण्याचे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरून वाघ यांच्यासह सात जणांविरूध्द दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आले. दुसरीकडे अमळनेर पंचायत समितीच्या माजी सभापती वजाबाई भील यांनी डॉ. पाटील यांच्याविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून डॉ. पाटील यांच्याविरूध्द अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.