उद्धव ठाकरे यांचे आवाहन

रत्नागिरी : कोकणात गुंडगिरीची परंपरा गेली पाच वर्षे खंडित झाली होती. पण आता ती पुन्हा डोके वर काढू पाहत आहे. ती कायमची गाडून टाकण्यासाठी महायुतीचे उमेदवार विनायक राऊत याना विजयी करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथे झालेल्या महायुतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

पाडवा, दिवाळी, रक्षाबंधन असे वेगवेगळे सण असले तरी काहीजणांचा कायमच शिमगा सुरु असतो, अशी टीका करताना  खासदार नारायण राणे यांचा नामोल्लेख टाळत  ठाकरे म्हणाले की, आज वेगवेळ्या पक्षाचे झेंडे महायुतीच्या निमित्ताने एकत्र असतात. कारण महायुतीचा कार्यकर्ता मनापासून काम करत आहे.  पण काहींनी आपल्या  घरातच झेंड्याचे दुकान थाटले आहे.  त्यांच्याकडे कोणताही ठोस विचार किंवा कृती कार्यक्रम नाही. काहींना लिहिता वाचता येत नसेल तर किमान ऐकू तरी यावे यासाठी केलेली काम मोठ्यांनी सांगा, असे मीच पालकमंत्र्यांना सांगितले होते. ऐकायला येत नसेल तर त्यांनी ती डोळ्यांनी तरी पहावीत. आम्ही कामे केली नसती तर हा जनसमुदाय आला नसता. इतरांच्या सभांचे फोटो पहिले तर जनतेऐवजी रिकाम्या खुर्च्याचीच गर्दी जास्त दिसते.  शिवसेनेत खुर्चीसाठी तडफडणारे नाहीत. या मतदार संघाला मोठी परंपरा आहे. ती मध्यंतरी खंडित झाली होती. तुम्ही ती गाडून टाकली. तीन निवडणुकांमध्ये त्यांना आडवे केले. आम्ही कधी विधानपरिषद, राज्यसभा मागायला गेलो नाही. मला खुर्चीचा मोह नाही. पण माझा देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील हे तुम्ही ठरवा, असे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री रवींद्र वायकर, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, आमदार सदानंद चव्हाण, राजन साळवी, भाजप आमदार प्रसाद लाड, उमेदवार विनायक राऊत आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी  सभेला उपस्थित होते.