कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे गुरुवारी कोल्हापुरात आगमन झाले. इस्लामपूर (जि. सांगली) येथील विजयी संकल्प सभेसाठी आज दुपारी साडेतीनच्या सुमारास उजळाईवाडी विमानतळावर हेलिकॉप्टरने आगमन झाल्यावर शिवसेनेच्यावतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. ठाकरे यांनी कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांशी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करून आढावा घेतला.

यावेळी शिवसेना नेते, परिवहनमंत्री दिवाकर रावते,जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पवार,विजय देवणे, माजी आमदार सुरेश साळोखे आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप,रिपाइं,रासप महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर येथे गुरुवारी सायंकाळी सभेचे आयोजन केले होते.  उद्धव ठाकरे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत.

सभेला जाण्यापूर्वी कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक, धैर्यशील माने,आमदार सुजित मिणचेकर, युवासेनेचे वरुन सरदेसाई यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा करून आढावा घेतला.

सभेसाठी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उद्धव ठाकरे सभेसाठी रवाना झाले. सभेनंतर रात्री बेळगाव मार्गे मुंबईला रवाना होणार असल्याचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पत्रकारांना सांगितले.

आज प्रभूंची सभा

दरम्यान, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची उद्या शुक्रवारी कोल्हापुरात सभा होणार आहे. येथील महासैनिक सभागृहात संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी प्रभू दुपारी उद्योजकांशी संवाद साधणार आहे.