‘एमआयएम’वर टीका

औरंगाबाद : शिवशाही हवी की दुसरी रझाकारी, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी ओवेसी यांच्या ‘एमआयएम’ पक्षावर टीका केली.

ओवेसींनी एका व्यासपीठावर येऊन त्यांच्या पक्षाचा संस्थापक कोण? त्यांनी कोणत्या कारणासाठी पक्ष स्थापन केला याची चर्चा करावी, असे आव्हान देत प्रचाराला अधिक टोकदार करण्याचा प्रयत्न उद्धव यांनी केला. एका बाजूला उद्धव ठाकरे यांची सभा सुरू होती, तर त्याच वेळी दुसऱ्या ठिकाणी ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांचीही जाहीर सभा झाली.

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील सभेत बोलताना ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलेच पाहिजे. त्या दिशेने कर्जमाफी हे पहिले पाऊल आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, हे माहीत आहे. पंतप्रधान पीक विमा योजना तळागाळापर्यंत पोहोचली नाही. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कानावर घातले आहे. त्यातल्या जाचक अटी-शर्ती काढून टाकू, असे त्यांनी आम्हाला सांगितले आहे. मधल्या यंत्रणेवर कायद्याचा बडगा उभारावा लागेल, असे प्रश्न सोडवता यावेत म्हणूनच केंद्रात मोदी सरकार हवे आहे, असेही ठाकरे म्हणाले.

हर्षवर्धन यांची हकालपट्टी

कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव हे आतापर्यंत शिवसेनेचे आमदार होते. मात्र त्यांनी भगव्याशी गद्दारी केली आहे. त्याची मी हकालपट्टी करतो आहे, अशा शब्दांत जाधव यांना फटकारले.