देशद्रोहाचे कलम काढल्यास उद्या दाऊद इब्राहिम येऊन बसेल. बांगलादेशीयांचा उपद्रव वाढेल. एवढेच काय, जे श्रीलंकेत झाले, ते आपल्याकडे होईल, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर काळेवाडीतील सभेत बोलताना टीकास्त्र सोडले. मावळात डाकूंचा प्रवेश झाल्याचे सांगत पवारांची दादागिरी मोडून काढू, असा इशाराही त्यांनी दिला.

मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. खासदार संजय राऊत, अमर साबळे, राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार लक्ष्मण जगताप, डॉ. नीलम गोऱ्हे, रवींद्र मिर्लेकर आदी या वेळी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले की, राहुल गांधींना इतिहासाचे ज्ञान नाही. सावरकरांविषयी ते ज्या पद्धतीने बोलतात, त्यांना लाज वाटली पाहिजे. क्रांतिकारकांचे बलिदान नसते तर पंतप्रधान होण्याचे स्वप्न तरी राहुल यांना पडले असते का. याच राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून शरद पवार बसतात. यांना (काँग्रेस-राष्ट्रवादी) फक्त पाडापाडीचे राजकारण जमते. त्यामुळे देशाचे धिंडवडे निघाले. पुन्हा अशा बकासुरांना सत्ता द्यायची का?

ठाकरे म्हणाले..

  • पराभव दिसू लागल्याने ईव्हीएमच्या तक्रारी
  • देशात ५० वर्षे दरोडेखोरांचेच राज्य
  • बारामतीची भानामती चालणार नाही
  • मावळात गोळीबार करणाऱ्यांना निवडून देणार का?

माजी खासदार गजानन बाबर स्वगृही

शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले माजी खासदार गजानन बाबर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेत शिवसेनेत पुनर्प्रवेश केला. पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेची स्थापना करणाऱ्यांपैकी एक असणारे बाबर शिवसेनेकडून तीन वेळा नगरसेवक, दोन वेळा आमदार आणि एकदा खासदार होते. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होते. पिंपरी पालिका निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये गेले. मात्र, शिवसेना सोडल्याचा त्यांना पश्चाताप होता. पक्षात परतण्यासाठी त्यांनी चहुबाजूने प्रयत्न केले. अखेर, उद्धव यांनी बाबर यांच्या पक्षप्रवेशास मान्यता दिली.