24 January 2020

News Flash

नाका कामगार प्रचारात; मजूरकामांना खीळ

राजकीय पक्षांकडे चांगली कमाई होत असल्याने नियमित कामांकडे पाठ

राजकीय पक्षांकडे चांगली कमाई होत असल्याने नियमित कामांकडे पाठ

आशीष धनगर, पूर्वा साडविलकर

ठाणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोम धरू लागला असताना ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच आसपासच्या शहरांमधील बांधकाम ठेकेदारांना गेल्या पंधरवडय़ापासून नाका कामगारांची वानवा जाणवू लागली आहे. प्रचारयात्रा, जाहीर सभांना जास्त गर्दी जमवण्यासाठी राजकीय पक्षांकडून या कामगारांना चांगला मोबदला दिला जात आहे. बांधकामाच्या ठिकाणी दिवसभर राबून पाचशे रुपये कमवण्यापेक्षा प्रचारफेरीत केवळ हिंडण्यासाठी पाचशे रुपये आणि जेवण-नाश्ता मिळत असल्याने हे कामगारदेखील आपली रोजंदारीची कामे सोडून तेथे जाऊ लागली आहेत. परिणामी ठेकेदारांना चढय़ा दराने मजूर मागवावे लागत आहेत.

कामाच्या शोधात उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि कर्नाटकसारख्या विविध राज्यांतून मुंबई-ठाण्यासारख्या शहरात शेकडो मजूर येत असतात. अंगमेहनतीच्या कोणत्याही कामांची तयारी असलेले हे कामगार शहरांतील प्रमुख नाक्यांवर दररोज सकाळी हजेरी लावतात. तेथे येणारे ठेकेदार आपापल्या गरजेनुसार या मजुरांना घेऊन जातात. अशा रोजंदारीच्या कामांतून दिवसाला ४०० ते ४५० रुपये हे कामगार कमवतात. परंतु, सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत या कामगारांचे दिवस पालटले आहेत.

ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच भिवंडी आणि आसपासच्या शहरांमध्ये  काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराचे शक्तिप्रदर्शन दाखविण्यासाठी नाका कामगारांशी संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. प्रचार सभा आणि रॅलीसाठी दोन ते तीन तासांसाठी ५०० रुपये मोबदला दिला जात आहे. त्यासोबतच एक वेळचे जेवणही मिळत आहे. इतर दिवसात करण्यात येणाऱ्या या कामापेक्षा हे काम सोपे आणि हलके असल्याने नाका कामगारही या कामाकडे आकर्षित होत आहेत. यामुळे निवडणूक काळात नाका कामगारांना एक वेगळी रोजगार संधी प्राप्त झाली आहे. तात्पुरता त्यांच्या रोजगाराचा प्रश्न जरी सुटला असला तरी कंत्राटदारांना मात्र कामासाठी मजूर मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. यामुळे कंत्राटदाराने घेतलेल्या कामात विलंब होत आहे.

मंडप उभारणीही अडचणीत

ठाण्यात राहणारे अभिजीत आगलावे यांचा मंडप उभारणीचा व्यवसाय आहे. सध्या लग्नसराईचा मोसम असल्याने त्यांच्याकडे मंडप उभारणीची मागणी आहे. गेल्या काही दिवसांपासून ते ठिकठिकाणी नाका कामगारांचा शोध घेत आहेत. मात्र, त्यांना नाका कामगार मिळेनासे झाले आहेत. जे नाका कामगार मिळतात. त्यांची पैशांची मागणी जास्त असते. त्यामुळे घेतलेली कामे पूर्ण कशी करणार या चिंतेत ते आहेत. तर, घोडबंदर येथे रस्त्याचे कंत्राट घेणाऱ्या एका कंत्राटदारानेही कामगार मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. अशीच चिंता घोडबंदर भागात एका बडय़ा बिल्डरच्या प्रकल्पावर कंत्राटी स्वरूपात कामे करणाऱ्या अफजल मिनाज यांनाही आहे. ठाण्यात माजिवडा, इंदिरानगर, लोकमान्यनगर, गोखले मार्गावर मजूर कामगारांचे ठरलेले नाके आहेत. गेल्या पंधरवडय़ापासून या नाक्यांवर अक्षरश शुकशुकाट असल्याचे मिनाज यांनी सांगितले. जे कामगार उपलब्ध असतात ते दिवसाला ७०० रुपयांची मागणी करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

First Published on April 24, 2019 3:11 am

Web Title: unorganised workers participating in political rally for money
Next Stories
1 मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाला
2 दिवसा तपासणी, रात्री शुकशुकाट
3 संघर्ष समितीला ‘शिंदेशाही’चे वावडे
Just Now!
X