उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार असणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उर्मिला मातोंडकर अनेकांच्या भेटीगाठी करत आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानी उर्मिला मातोंडकर यांनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. लोकसभा निवडणूक आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे.

उर्मिला मातोंडकर या उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवत आहेत. तर युतीचे गोपाळ शेट्टी या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी संजय निरूपम यांचा पराभव केला होता. यावेळी शेट्टी यांच्या विरोधात काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होईल अशी चिन्हं आहेत.

उर्मिला मातोंडकर ६९ कोटींच्या धनी
चित्रपटसृष्टीत एकेकाळी रंगीला, जुदाई सारख्या हिट्ट चित्रपटांच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजविणारी आणि राजकीय पटलावर प्रथमच आपले भाग्य आजमाविण्यास सज्ज झालेल्या काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर या तब्बल ६९ कोटींच्या धनी आहेत. रुपारेल महाविद्यालयातून एसवायबीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या मातोंडकर यांच्यावर कोणताही गुन्हा नाही. मातोंडकर दाम्पत्याकडे तब्बल ४१ कोटी २५ लाखांची जंगम तर २७ कोटी ६४ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यामध्ये तब्बल ६६ लाखांची आलिशान मर्सिडिज, १६ लाखांची टाटा स्टार्म, सात लाखांची हय़ुंदाई आय-२० तसेच दोन लाखांची रॉयल ईनफिल्ड अशा महागडय़ा गाडय़ा असून एक कोटी २७ लाखांचे हिरे १७ लाखांचे दागिने आणि वसईत एक कोटी ६८ लाखांची नऊ एकर शेतजमीन आहे. त्याचप्रमाणे मुंबईत राहत्या घरासह व्यापारी, निवासी गाळे अशी २५ कोटींची मालमत्ता असून ५० लाखांचे कर्ज आहे.