20 November 2019

News Flash

साडेचार हजार मतदारांची गडकरी, पटोलेंसह सर्वानाच नापसंती

गपूरमध्ये ०.३९ टक्के(४,५३८) मतदारांनी तर रामटेक मतदारसंघात (११,८००) टक्के मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केला.

प्रतिकात्मक छायाचित्र

रामटेकमध्ये ११,८०० मतदारांकडून ‘नोटा’चा वापर

निवडणुकीच्या रिंगणात पसंतीचा उमेदवार नसेल तर मतदारांना ‘नोटा’चा (नकारात्मक मत) पर्याय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिला आहे. नागपूरमध्ये ०.३९ टक्के(४,५३८) मतदारांनी तर रामटेक मतदारसंघात (११,८००) टक्के मतदारांनी याचा प्रयोग करून रिंगणातील उमेदवारांबाबत नापसंती व्यक्त केली.

नागपूरच्या तुलनेत नोटाचा वापर करणाऱ्यांची संख्या रामटेकमध्ये अधिक आहे हे येथे उल्लेखनीय. नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (भाजप) यांच्यासह एकूण ३० उमेदवार रिंगणात होते. त्यात प्रामुख्याने काँग्रेसचे नाना पटोले, बसपाचे मो. जमाल, अ‍ॅड. सुरेश माने (बीआरएसपी) यांच्यासह कायद्याचे अभ्यासक वकील, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि इतरांचाही समावेश होता. गडकरी यांनी त्यांच्या  पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेली विविध विकास कामे मतदारांच्या डोळ्यापुढे होती. नाना पटोले यांचा शेतकऱ्यांसाठीचा संघर्षही सर्वपरिचित होता. अ‍ॅड. सुरेश माने प्रसिद्ध वकील आहेत. असे असताना नागपुरात मतदान करणाऱ्या ११ लाख ८६ हजार ५ मतदारांपैकी ४,३३६ मतदारांना रिंगणात असलेला एकही उमेदवार मतदानासाठी पात्र वाटला नाही, त्यामुळे त्यांनी मतदान तर केले मात्र ‘नोटा’चा अधिकार वापरला. एकूण मतदानात हे प्रमाण ०.३९ टक्के आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघातही एकूण १६ उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेचे  विद्यमान खासदार कृपाल तुमाने, काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये, बीएसपीचे सुभाष गजभिये, वंचित बहुजन आघाडीच्या किरण रोडगे आदींचा त्यात समावेश होता. इतर उमेदवारांमध्ये एक डॉक्टर, एक प्राध्यापकही होता. काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये हे माजी सनदी अधिकारी आहेत. मात्र, या मतदारसंघातील ११ हजार ८०० मतदारांना १६ पैकी एकही उमेदवार मतदानासाठी पात्र वाटला नाही, त्यामुळे त्यांनी ‘नोटा’चा वापर केला. या मतदारसंघात एकूण ११ लाख ९२ हजार ४२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यात वरील ११,८०० मतदारांचा समावेश आहे. नोटा वापरणाऱ्यांचे प्रमाण एकूण मतदानात १ टक्का आहे.

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील मतदार हा सुज्ञ असतो, तो विचारपूर्वक मतदान करतो, विशेषत: युवकांबाबत असे मानले जाते. त्यामुळे उमेदवार मतदानाच्या पात्रतेचा नसेल तर ते ‘नोटा’चा पर्याय स्वीकारतात. मात्र, यावेळच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघात ‘नोटा’चा वापर करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

नागपूर लोकसभा

एकूण मतदान : ११ लाख ८१ हजार ७१५

‘नोटा’चा वापर : ४,५३८ (०.३९ टक्के)

रामटेक लोकसभा

एकूण मतदान : ११,९२,४२९

‘नोटा’चा वापर : ११,८०० (१ टक्का)

First Published on May 25, 2019 12:42 am

Web Title: use of nota from 11800 voters in ramtek
Just Now!
X