वर्ध्यातील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाच्या मुद्दावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने हिंदू दहशतवाद हा शब्द वापरुन देशाचा अपमान केला आहे. हिंदू दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असण्याची जगामध्ये एकही घटना नाहीय. हिंदू दहशतवाद हा शब्द आणून काँग्रेसने पाच हजार वर्षापेक्षा जुनी संस्कृती बदनाम करण्याचा प्रयत्न केला असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.

हिंदू आतंकवाद शब्द ऐकून तुम्हाला दु:ख झालं नाही का ? हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही. काँग्रेसने हिंदुंना अपमानित करण्याचं पाप केलं. सुशीलकुमार शिंदेंनी हिंदू दहशतवादाचा उल्लेख केला. हिंदू दहशतवादाच्या पापातून काँग्रेसला कधीही मुक्ती मिळणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या देशातील कोटयावधी लोकांवर हिंदू दहशतवादाचा डाग लावण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. ब्रिटिश इतिहासकारांनी सुद्धा हिंदू हिंसक होऊ शकतात याचा उल्लेख केलेला नाही असे मोदी म्हणाले.

एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यावरही त्यांनी हल्लाबोल केला. जे हिंदुस्थानचे नायक आहे त्यांची गरज आहे की, जे पाकिस्तानात हिरो बनले त्यांची गरज आहे ? असा सवाल त्यांनी केला. ही तीच काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे ज्यांनी आझाद मैदानात जमावाला शहीदांच्या स्मारकावर चप्पल मारण्याची सूट दिली होती अशा शब्दात मोदींनी आघाडीचा समाचार घेतला.