लोकसभा निवडणूक २०१९ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार देखील सुरू झाला आहे. अवघ्या काही दिवसातच मतदानाला सुरूवात होणार आहे. निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना कोट्यवधी रुपये लागतात. पण हिंगोलीमधील ९ रुपये वार्षिक उपन्न असणाऱ्या उमेदवाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या उमेदवाराने आता पर्यंत ३० वेळा निवडणूक लढवून झाली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

उत्तम भागाजी कांबळे असे या उमेदवारांचे नाव आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघातून उत्तम यांनी आतापर्यंत तब्बल ३० वेळा निवडणूक लढवली आहे. आता ते दोन मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. तसेच उत्तम यांचे वार्षिक उत्पन्न केवळ ९ रुपये आहे असाही दावा या वृत्तवाहिनीने केला आहे. उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या रक्कमेसाठी उत्तम यांनी जमेल ती वस्तू विकून कर्ज काढले आहे. या वस्तूंमध्ये त्यांच्या आईच्या मंगळसुत्राचा देखील समावेश आहे. इतक्या निवडणूक हारल्यानंतरही त्यांनी हिंमत हारली नाही तर जोमाने पुन्हा उभे राहून येईल ती निवडणुक लढवण्याची ताकद दाखवली आहे.

उत्तम कांबळेंनी आतापर्यंत चारवेळा लोकसभा, सहावेळा विधानसभा, एकदा जिल्हा परिषद, तीनवेळा पंचायत समिती, चारवेळा तंटामुक्ती आणि सहावेळा ग्रामपंचायत निवडणूक लढवली आहे. सध्या ते वाशिम-यवतमाळ आणि हिंगोली लोकसभा अशा दोन मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांचे एमकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे. गावाच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी उत्तम यांनी स्वखर्चातून अनेक कामे केली आहेत. उत्तम कांबळे यांना जिल्ह्यातील सर्वजण ‘लोकप्रतिनिधी कांबळे’ या नावाने ओळखतात.