विरोधकांची निवडणूक आयोगाकडे मागणी

मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपप्रणीत ‘एनडीए’ला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर, मतदान यंत्रांमध्ये गडबड झाल्याच्या कथित मुद्दय़ावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. मतमोजणीतील पारदर्शक प्रक्रियेसाठी मतपावत्यांची (व्हीव्हीपॅट) मतमोजणी सर्वात आधी केली जावी, त्यानंतरच उर्वरित यंत्रांमधील मतांची मोजणी व्हावी, अशी मागणी विरोधकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत बुधवारी निर्णय घेतला जाईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

लोकसभा मतदारसंघातील एका जरी व्हीव्हीपॅट मतदान यंत्राची मतमोजणी करताना व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम यावर नोंदवलेल्या मतामध्ये तफावत आढळल्यास सर्व विधानसभा मतदारसंघांमधील मतपावत्या ईव्हीएमची मतांच्या सारखेपणाबाबत शहानिशा केली जावी, अशीही मागणी विरोधकांनी केली. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मतांची शहानिशा केली जाईल, असे निवडणूक आयोगाने यापूर्वी स्पष्ट केले आहे. पण, त्याला शिष्टमंडळातील सदस्यांनी विरोध केला आहे.

मतपावती आमि मतदान यंत्रातील मोजणी आणि शहानिशा सुरुवातीला झाली तर संभाव्य विसंगती मतमोजणी संपण्याआधीच समजू शकेल. विसंगती आढळल्यास सर्व मतांच्या सारखेपणासाठी शहानिशा करता येईल आणि संभाव्य तफावत ताडून पाहता येईल, असे निवडणूक आयोगाला भेटलेल्या शिष्टमंडळातील काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.

मतदान यंत्रावर बटन दाबल्यानंतर कोणत्या पक्षाला मत दिले गेले याची नोंद मतपावतीद्वारे होते. नोंदवलेले मत आणि झालेली मताची नोंद यात सारखेपणा आहे की नाही, हे तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा मतदारसंघातील कुठल्याही पाच व्हीव्हीपॅट जोडलेल्या ईव्हीएमची मतांच्या सारखेपणासाठी शहानिशा करण्याचा आदेश दिला होता, मात्र ही शहानिशा मतमोजणीच्या सुरुवातीला करायची की शेवटी हे न्यायालयाने स्पष्ट केलेले नाही.

मतदान यंत्राच्या अदलाबदलीची भीती विरोधक गेला दीड महिना व्यक्त करत आहेत. मतमोजणी निशंकपणे व्हावी यासाठी पाच व्हीव्हीपॅट ईव्हीएममधील मतांच्या सारखेपणाची शहानिशा मतमोजणी प्रक्रियेच्या सुरुवातीलाच व्हावी, अशी मागणी केल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले. मतदान यंत्राबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवर कोणती भूमिका घ्यायची यावर दिल्लीमध्ये मंगळवारी २२ बिगर भाजप पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.

या बैठकीला तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्षाचे नेतेही सहभागी झाले होते.

शिष्टमंडळात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सपचे रामगोपाल यादव, बसपचे सतीश चंद्रा, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी, सीपीआयचे नेते डी. राजा आदी उपस्थित होते.

तफावत आढळली तर काय करणार?

व्हीव्हीपॅटमधील नोंद आणि ईव्हीएममधील मतांची नोंद यामध्ये तफावत आढळली तर काय मार्ग काढणार हे अजून निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले नाही, असा मुद्दा सीताराम येचुरी यांनी उपस्थित केला. एका जरी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमध्ये शहानिशा करताना तफावत आढळली तरी सर्व विधानसभामतदारसंघातील व्हीव्हीपॅट ईव्हीएमची शहानिशा केली पाहिजे, असे मत येचुरी यांनी नोंदवले.