पश्चिम बंगालमधील एका प्रचारसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडण्यासाठी एक कार्यकर्ता थेट मंचावर आला. मात्र त्यानंतर जे काही घडलं ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपानेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या प्रसंगाचा व्हिडीओ शेअर केला आहे. झालं असं की मोदींच्या पाया पडण्यासाठी मंचावर आलेला कार्यकर्ता मोदींसमोर नतमस्तक झाला तेव्हा मोदींनीच या कार्यकर्त्याचे पाय पकडले. भाजपाने हा व्हिडीओ शेअर करत मोदींनी केलेली कृती हे संस्कार दाखवणारी असल्याचं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधावारी पश्चिम बंगालमधील कांथी येथे प्रचारसभेसाठी पोहचले होते. सर्व स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांसोबत मोदी मंचावर ठेवलेल्या खुर्च्यांवर आसनस्थ होत असतानाच एक कार्यकर्ता मंचावर आला. मोदींच्या पाया पडण्यासाठी तो मोदींच्या दिशेने चालू लागला आणि त्यांच्यापासून काही अंतरावर थांबत तो नतमस्तक झाला. मात्र मोदींही खाली वाकून या कार्यकर्त्याच्या पाया पडले.

भाजपाने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. “भाजपा एक अशी सुसंस्कृत संघटना आहे जिथे कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांबद्दल समान संस्कार आणि प्रेम असतं. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जेव्हा एक भाजपा कार्यकर्ता पाया पडण्यासाठी आला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याच्या पाया पडून त्याचं अभिवादन स्वीकारलं,” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलीय. मोदीच कार्यकर्त्याच्या पाया पडल्यानंतर सभेला आलेल्या समर्थकांनी आवाज करत पंतप्रधांनाच्या कृतीचं एकप्रकारे समर्थनच केलं.

कंथा येथील आपल्या भाषणामध्ये मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खोटे आरोप करुन नंदीग्राममधील लोकांचा अपमान केल्याची टीका केली. नंदीग्रामचे लोकं ममतांना योग्य पद्धतीने उत्तर देतील असंही मोदी म्हणाले आहेत. १० मार्च रोजी ममतांवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत मोदींनी, “तुम्ही संपूर्ण देशासमोर नंदीग्राम आणि येथील लोकांची बदनामी करत आहात. हे तेच नंदीग्राम आहे ज्याने तुम्हाला इतकं काही दिलं आहे. नंदीग्रामचे लोकं तुम्हाला माफ करणार नाही. तुम्हाला ते योग्य उत्तर देतील,” असं म्हटलं. १० मार्च रोजी ममतांवर नंदीग्राममध्येच हल्ला झाल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला होता.

पश्चिम बंगालमधील २९४ जागांसाठी २७ मार्चपासून २९ मार्चपर्यंत आठ टप्प्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. २७ मार्च, एक एप्रिल, सहा एप्रिल, १० एप्रिल, १७ एप्रिल, २२ एप्रिल, २६ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर दोन मे रोजी या निवडणुकींचा निकाल लागणार आहे.