लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास अद्याप वेळ असताना ट्विटरवर ईव्हीएम मशीन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. या व्हिडीओंमध्ये ईव्हीएम मशीन्स अनधिकृत ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचं दिसत आहे. यापैकी काही मशीन्स स्थानिक दुकानात, तर काही खासगी गाडीत असल्याचं दिसत आहे.

असाच एक उत्तर प्रदेशातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये काहीजण ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स गाडीतून बाहेर काढून एका दुकानाच्या आतमध्ये नेत असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशातील चंदौली येथील हा व्हिडीओ आहे.

अजून एक व्हिडीओ आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याने शेअर केला आहे. या व्हिडीओत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स एका कारमध्ये असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पंजाबमधील आहे. आपच्या महिला कार्यकर्त्याने यावरुन भाजपाला टार्गेट केलं आहे.

अजून एक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओत एक व्यक्ती उमेदवारांना कोणतीही माहिती न देता ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर आणत असल्याचा आरोप करत आहे.

यादरम्यान, महाआघाडीचे उमेदवार अफजल अन्सारी जे बसपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत त्यांनी ईव्हीएमची अदलाबदली केली जात असल्याचा आरोप केला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवरुन संशय व्यक्त केला आहे. ईव्हीएमसोबत छेडछाड करणं फोन टॅप करण्याइतकं सोपं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनीदेखील खासगी वाहनांमध्ये ईव्हीएम का सापडत आहेत ? असा सवाल विचारला असून सपाकडूनही छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईव्हीएम सुरक्षित नसल्याचा विरोधकांचा आरोप असून यासंबंधी निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.