सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोटमधील हवाई हल्ल्यांवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन कारगिल युद्धातील शहीद कॅप्टन यांचे वडील जी एल बत्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोटमधील हवाई हल्ले हे दोन्ही निर्णय योग्यच होते. मात्र, लष्करी कारवाईचे राजकारण करणे मला पटत नाही, या गोष्टींबाबत लष्करी अधिकारी किंवा संरक्षण मंत्रीच भाष्य करु शकतात, अन्य नेत्यांनी याबाबत भाष्य करणे चुकीचे आहे, असे खडेबोल त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना सुनावले आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये एकूण १ लाख ५१ हजार निवृत्त लष्करी जवान आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडियन एक्स्प्रेसने शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया घेतली. लष्करी कारवाईवरुन सुरु असलेल्या राजकारणावर या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफमधील कॉन्स्टेबल तिलकराज हे शहीद झाले होते. तिलकराज यांचे कुटुंबीय हिमाचलमधील कांगडा जिल्ह्यातील जावील या गावात राहतात. तिलक राज यांची पत्नी सावित्री म्हणतात, अजून आमच्या घरी कोणताही नेता प्रचारासाठी आलेला नाही. सैन्याच्या कारवाईवरुन सुरु असलेल्या राजकारणावर त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले. मतांसाठीच तर हा गाजावाजा सुरु आहे. पण लष्करी कारवाई हा काही तोडगा नाही. आपण १० जणांना मारले तर ते देखील १० लोक मारतील, असेही सावित्री यांनी सांगितले.

पालमपूर येथे राहणारे शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचे वडील जी एल बत्रा यांनी देखील सत्ताधाऱ्यांचे कान टोचले. लष्करी कारवाईबाबत नेत्यांनी बोलणे चुकीचे आहे, याबाबत फक्त लष्करी अधिकाऱ्यांनीच भाष्य केले पाहिजे, असे बत्रा म्हणालेत.

हमीरपूर येथे राहणारे निवृत्त कर्नल एसकेएस चंबियाल म्हणाले, भाजपा नेत्यांची भाषणं देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहेत. पण सध्या भाजपा नेत्यांना फक्त निवडणुकीतील विजयच महत्त्वाचा वाटतो.