विनोद तावडे यांची टीका

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दादा-ताई आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मतदारसंघातच अडकून पडले असून या वयात पक्षाच्या प्रचारासाठी एकटे वणवण फिरण्याची वेळ शरद पवार यांच्यावर आली आहे, असा चिमटा भाजपचे नेते विनोद तावडे यांनी काढला आहे. त्याचबरोबर नांदेडमध्ये भाजपने प्रचारात मुसंडी मारल्याने तुम्हीच मला वाचवा, अशी भावनिक साद मतदारांना घालण्याची वेळ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर आल्याचेही तावडे यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान दोन दिवसांवर आले आहे. मात्र, विरोधी पक्षातील बडे नेते हे त्यांच्या मतदारसंघातच अडकून पडले आहेत. त्यावरूनच भाजप-शिवसेनेच्या बाजूने वातावरण असल्याचे लक्षात येते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे मुलगा पार्थच्या प्रचारात मावळमध्ये अडकून पडले आहेत. तर सुप्रियाताई सुळे या बारामतीत अडकून पडल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही सांगली-हातकणंगलेमध्ये अडकून पडले आहेत. राज्यभरात पक्षाच्या प्रचारासाठी एकटय़ाने फिरण्याची वेळ शरद पवार यांच्यावर आली आहे, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. नांदेडमध्ये भाजपचे प्रताप पाटील-चिखलीकर यांनी तगडे आव्हान उभे केल्याने अशोक चव्हाण हे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असूनही राज्यभरात फिरण्याच्या परिस्थितीत नाहीत. ते नांदेडमध्येच अडकून पडले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून राज्य सरकार चक्रव्यूहात अडकवत असल्याने तुम्हीच मला वाचवा, अशी साद घालत भावनिक  राजकारण करण्याची वेळ चव्हाण यांच्यावर आल्याचे तावडे म्हणाले.