भाजपा २७ एप्रिल रोजी मनसेच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणार असताना आता काँग्रेसला भीती वाटू लागली आहे. मनसे आणि काँग्रेस एकत्र आहेत का? असा प्रश्न शिक्षणमंत्री आणि भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी विचारला आहे. भाजपाने उद्या सभा घेतली तर आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी मिळणार नाही असा आक्षेप घेत काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पण जर तुमचे खरे असेल तर मग घाबरता कशाला? तुम्ही खोटे बोलता म्हणून तुम्ही घाबरता. त्यामुळेच तुमच्या खोटारडेपणाचा आम्ही पर्दाफाश करणार आहोत असेही तावडे यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा हा विधानसभा अध्यक्षांकडे दिला पाहिजे आणि तो विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारुन विधानसभेत त्याची घोषणा केली पाहीजे, असे स्पष्ट करतानाच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले की, जर विखे-पाटील यांचा राजीनामा अध्यक्षांनी स्वीकारला आणि कालिदास कोळंबकर भाजप बरोबर काम करत आहेत, नितेश राणेही काँग्रेस बरोबर नाहीत आणि अब्दुल सत्तार यांची काँग्रेसने हकालपट्टी केली आहे, याचा अर्थ काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे, अशी वस्तुस्थिती असताना पुढील विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा न होता बहुधा राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल, अशी शक्यता तावडे यांनी आज व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मुंबईत एकही जागा मिळणार नाही व काँग्रेस सपाटून मार खाणार आहे अशी चाहूल काँग्रेसला आधीच लागली आहे. महाराष्ट्रात राहुल गांधी यांची जाहीर सभा घेऊनही काँग्रेसचा पराभव होऊ शकेल अशी भीती काँग्रेसला वाटली असावी म्हणूनच राहुल गांधी यांची मुंबईत जाहीर सभा आणि रोड शो होणार नाही अशी शक्यता तावडे यांनी व्य़क्त केली आहे.

काँग्रेसने दोन महिन्यापूर्वी हुकुमाचा एक्का म्हणुन प्रियंका गांधी यांना राजकारणात उतरवले तसेच वाराणसी मतदार संघातून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढविणार अशी हवा केली परंतु पराभवाची चाहूल लागताच काँग्रेसने आपला हुकुमी एक्का म्यान करुन टाकला अशी टीकाही तावडे यांनी केली.

राज ठाकरे सध्या खोटे बोलत आहेत. त्यांनी कालच्या सभेत दाखविलेला एक फोटो मुळात भाजपाचा नाही, पी.एम. ऑफीसचा नाही, सी.एम. ऑफिसचा नाही, माझ्या ऑफिसचा नाही असे स्पष्ट करतानाच तावडे यांनी सांगितले की, मोदी यांनी फॉर्म भरताना अटलजींच्या अंत्ययात्रेची गर्दी दाखवली आहे असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे आणि हा फोटो समजा २०१४ मधील असेल, तर २०१४ मध्ये अटलजी यांचे निधन झाले होते का ? त्यामुळे राज ठाकरे खोटे बोलत आहे व जनतेला मूर्ख बनवत आहेत असा आरोपही त्यांनी केला.