अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या चर्चेत आहे तो पीएम नरेंद्र मोदी या सिनेमामुळे. या सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका तो साकारतो आहे. तसंच तो भाजपाचा समर्थकही आहे. अशात एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्यानंतर त्याने शेअर केलेल्या एका मीममुळे त्याच्यावर चांगलीच टीका होते आहे. विवेक ओबेरॉयने एक्झिट पोल कसे असतात? हे सांगण्यासाठी चक्क सलमान ऐश्वर्या प्रकरण उकरून काढले आहे.

काय आहे मीममध्ये?
एक्झिट पोल समोर आल्यापासून हे मीम व्हायरल होते आहे. हेच मीम विवेक ओबेरॉयने ट्विटरवर पोस्ट केले आहे. या मीममध्ये तीन फोटो आहेत. पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत असलेला फोटो आहे त्याखाली ओपिनियन पोल असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय असा फोटो आहे. त्या फोटोत एक्झिट पोल असे लिहिले आहे. त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अराध्या यांचा फोटो आहे त्याफोटोखाली रिझल्ट असं लिहिलं आहे. हे मीम विवेक ओबेरॉयने तयार केलेले नाही. मात्र ते शेअर करत हे मीम आपल्याला खरोखरच आवडले अशी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यानंतर त्याला ट्रोल व्हावे लागले आहे.

हे मीम पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांच्या टीकेचा विवेक ओबेरॉयला सामना करावा लागला आहे. विवेक तुला काय झाले आहे? तुला असे करणे शोभते का? ऐश्वर्या रायच्या व्यक्तीगत आयुष्यावरून तू टीपण्णी का करतो आहेस ? हे आणि असे अनेक प्रश्न उपस्थित करत विवेक ओबेरॉयवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. तर काही नेटकऱ्यांनी विवेक ओबेरॉयबाबत इतर मीम करत त्याचीही खिल्ली उडवली आहे.