पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकींच्या सहाव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. ४३ मतदारसंघांसाठी आज मतदान होत असून एक कोटींहून अधिक मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ३०६ उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणारय. करोनाची दुसरी लाट आणि मागील टप्प्यांमधील मतदानादरम्यान झालेल्या हिंसेंच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा अधिक वाढवण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान १० एप्रिल रोजी कूच बिहारमधील गावात झालेल्या हिंसेत पाच जणांना जीव गमावावा लागला होता.

मतदान शांतते आणि योग्य पद्धतीने पार पडावं यासाठी सहाव्या चरणातील मतदानाच्या दिवशी केंद्रीय सुरक्षा दलांच्या कमीत कमी एक हजार ७१ जवान तैनात करण्यात आले आहेत. मतदानाच्या दरम्यान करोनासंदर्भातील नियमांचेही योग्य पद्धतीने पालन करण्यासंदर्भातील सुचना सर्व मतदान केंद्रांवर देण्यात आल्या आहेत. सकाळी तास वाजल्यापासून येथे मतदान सुरु झाली असून अनेक मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहे.

पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी करोनाचे नऊ हजार ८१९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. बंगलामधील ही २४ तासांमधील सर्वोच्च रुग्णसंख्या ठरली आहे. आज होणाऱ्या मदतानामध्ये उत्तर २४ परगना जिल्ह्यातील १७ जागांबरोबरच नादिया आणि उत्तर दिनाजपुरमधील प्रत्येकी नऊ जागांसाठी मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे पूर्व बर्ध्दमानमधील आठ जागांसाठीही आज मतदान होत आहे.

आज होणाऱ्या मतदानामध्ये भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय, तृणमूलचे मंत्री ज्योतिप्रिय मल्लिक आणि चंद्रिमा भट्टाचार्य तसेच माकपा नेते तन्मय भट्टाचार्य यांचं भविष्य मतपेटीत कैद होणार आहे. त्याचबरोबर चित्रपट निर्देशक राज चक्रवर्ती, अभिनेत्री कौसानी मुखर्जी सुद्धा तृणमूलच्या तिकीटावर लढत असून त्यांच्या नशिबाचा फैललाही आज होणार आहे. चार जिल्ह्यांमधील ४३ विधानसभा क्षेत्रांमध्ये १४ हजार ४८० मतदान केंद्र उभारण्यात आली असून भाजपा विरुद्ध तृणमूल अशी थेट लढाई या सर्वच मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे. तृणमूलकडून ममता बॅनर्जी तर भाजपाकडून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक प्रचारात सहभाग घेतल्याने या निवडणुकीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.