२१ लाख मतदार ठरवणार ३० उमेदवारांचे भवितव्य; लोकसभेसाठी आज मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर शहरात गुरुवारी सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात होणार असून २१ लाख मतदार ३० उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लढत काँग्रेसचे  नाना पटोले यांच्याशी आहे. बसपाचे मो. जमाल आणि वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासेही रिंगणात आहेत. २३ मे रोजी मतमोजणी आहे.

२०१४ च्या निवडणुकीत गडकरी प्रथमच नागपूर या संघभूमीतून लोकसभेसाठी मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले होते. पाच वर्षांत केलेल्या शहर विकास कामाच्या आधारावर ते यावेळी पुन्हा मतदारांपुढे गेले आहेत. दुसरीकडे काँग्रेसने नाना पटोले यांच्या रूपात नवीन चेहरा दिला आहे. त्यामुळे पक्षसंघटनेतील हेवेदावे विसरून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सामाजिक समीकरणाच्या आधारावर त्यांनी मतदारांना साद घातली आहे. बसपाचे मो. जमाल आणि प्रकाश आंबेडकर प्रणीत वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासेही रिंगणात आहे. मुस्लीम आणि दलित मते या मतदारसंघात निर्णायक आहेत.

जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. २१ लाख २६ हजार ५७४ मतदारांसाठी २०६५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातील ४० संवेदनशील आहेत. यावेळी व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतदारांनी दिलेले मत संबंधित उमेदवाराला गेले किंवा नाही हे पाहता येणार आहे. महिलांसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक विशेष मतदान केंद्र (सखी)असणार आहे. त्याचे व्यवस्थापन महिलांच्या हाती असेल. अपंगांना त्यांच्या घरून केंद्रावर नेण्यासाठी वाहनांची, केंद्रावर रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळा असल्याने सर्व केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. १५०० मतदारामागे एका केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त मतदार असलेल्या ठिकाणी सहाय्यक केंद्र मजूर करण्यात आले आहे. दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात ११ नवीन केंद्र असणार आहेत. उमेदवारांना मतदार यादीत त्यांची नावे शोधण्यासाठी आयोगाने संकेतस्थळासह मोबाईल अ‍ॅपचीही व्यवस्था केली आहे.

मतदारांच्या संख्येत वाढ

२०१४ च्या निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १९,००७४८ होती. २०१९ मध्ये (३१ जानेवारीपर्यंत) २१,२६,५७६ आहे. एकूण २ लाख २५ हजार,८२६ मतदार २०१४ च्या तुलनेत वाढले आहेत.

नागपूर लोकसभा -२०१९

एकूण मतदार -२१,२६,५७६

एकूण मतदान केंद्र -२०३७

नागपूर लोकसभा -२०१४

एकूण मतदार -१९००७४८

झालेले मतदान -१०,८५,७६५  (५७.१२ टक्के)

यादीत नावे नसल्याची तक्रार

अनेकांनी नोंदणी करूनही त्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली नाही, अशी तक्रार मतदारांची आहे. यात युवकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या युवकांकडे नोंदणी अर्ज दाखल केल्याची पावती आहे. त्यांचा अर्ज स्वीकारला गेला किंवा नाकारला याबाबत त्यांना कळवण्यात आले नाही. चिंचभुवन केंद्रावरील अर्जाबाबत ही तक्रार आहे. तसेच अनेक वर्षांपासून मतदान करणारे आणि आयोगाचे ओळखपत्र असणारे शफाकत हुसेन (रा. जागनाथ बुधवारी, मध्य नागपूर) यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे नाव यादीत नाही, अशी तक्रार त्यांनी ‘लोकसत्ता’कडे केली आहे.

१० टक्के केंद्रांवर वेबकास्ट

यंदा निवडणूक आयोगाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी एकूण मतदान केंद्रांच्या १० टक्के केंद्रांवर वेबकास्टची सोय केली आहे. शहरातील २०० वर केंद्रांवर याची व्यवस्था करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षातून तेथे नजर ठेवण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणूक ही लोकशाही बळकटीकरणासाठी महत्त्वाची आहे. मतदारांनी लोकशाहीच्या  या उत्सवात सहभागी व्हावे.’’

– अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी, नागपूर