गैरप्रकारांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाची ग्वाही

लोकसभा निवडणुकीत वापरली गेलेली मतदान यंत्रे (ईव्हीएम) पूर्ण सुरक्षित असून स्ट्राँगरूममध्ये कडेकोट बंदोबस्तात आहेत, अशी ग्वाही निवडणूक आयोगाने मंगळवारी दिली. ही यंत्रे अन्यत्र नेली जात असून त्यात फेरफार सुरू असल्याच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर झळकताच काही ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्त आंदोलन सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाने निवेदनाद्वारे हे स्पष्टीकरण केले आहे.

मतदानाचे निकाल जाहीर व्हायला दोन दिवस उरले असतानाच समाजमाध्यमांवर ही चित्रफीत झळकू लागल्याने खळबळ उडाली. विरोधकांनीही आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली, तसेच माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनीही चिंता व्यक्त केली. त्यानंतर आयोगाने हा खुलासा केला.

या चित्रफितीत दिसणारी यंत्रे या निवडणुकीत वापरली गेलेली नाहीत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. सर्व मतदान यंत्रे आणि मतपावती यंत्रांना निवडणूक निरीक्षक तसेच सर्व उमेदवारांसमक्ष दुहेरी कुलूप लावले गेले असून ती मोहोरबंद केली गेली आहेत. तसेच कडेकोट बंदोबस्त असलेल्या स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित राखली आहेत. ही सर्व प्रक्रिया तसेच स्ट्राँगरूमलाही सील ठोकल्याची प्रक्रिया चित्रित केली गेली आहे. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत सीसीटीव्हीद्वारे सर्व यंत्रांवर लक्ष ठेवले जात आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातर्फे बंदोबस्त राखला जात आहे. इतकेच नाही तर सर्वपक्षीय प्रतिनिधी या स्ट्राँगरूमबाहेर दिवस-रात्र थांबून आहेत. मतमोजणीच्या दिवशी सर्वपक्षीय उमेदवार आणि प्रतिनिधींच्या समक्ष या स्ट्राँगरूमचे सील तोडले जाईल आणि या प्रक्रियेचेही चित्रीकरण होईल. मतमोजणीआधी प्रत्येक यंत्रावरील पत्ता, अनुक्रमांक आणि सीलची पडताळणी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना करता येणार आहे.

आयोगाने निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांबरोबर ९३ बैठका घेतल्या असून त्यात ही सर्व प्रक्रिया वारंवार समजावून सांगण्यात आली आहे. या यंत्रांची सुरक्षाकडी लक्षात घेता कोणत्याही यंत्रापर्यंत कुणालाही पोहोचता येणे अशक्य आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. चित्रफितीत जी यंत्रे दिसत आहेत ती स्ट्राँगरूममध्ये नेली जातानाच्या वेळची असावीत किंवा न वापरलेली असावीत, असेही आयोगाने म्हटले आहे.

मतदान यंत्रांशी संबंधित प्रत्येक तक्रारीची आयोगाने गंभीर दखल घेतली असून तत्काळ चौकशी करून कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाईही केली आहे, असे आयोगाने म्हटले आहे.

प्रणब मुखर्जीना चिंता : मतदान यंत्रांबाबत ज्या शंका व्यक्त केल्या जात आहेत, त्याबद्दल माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. या सर्व शंकांचे निराकरण करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाने पार पाडायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मतदान यंत्रांची सुरक्षा ही आयोगाची जबाबदारी असून त्यांनी ती नेटाने पार पाडली पाहिजे.

‘मतपडताळणी आधी करा’

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीआधी मतपावत्यांची पडताळणी केली जावी, अशी मागणी २२ विरोधी पक्षांच्या वतीने मंगळवारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. जर त्यात काही तफावत आढळली तर त्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील सर्वच मतपावत्यांची पडताळणी केली जावी, अशीही त्यांची मागणी आहे. या प्रश्नावर बुधवारी निर्णय घेऊ, असे आयोगाने विरोधकांना सांगितले आहे.

मतभेद गोपनीयच राखणार

आचारसंहिता भंगाबद्दलच्या निर्णयातील मतभिन्नता उघड केली जाणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगाच्या मंगळवारच्या बैठकीत झाला. निर्णयातील आपले दुमत जाहीर केले जावे, अशी मागणी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी केली होती, ती फेटाळण्यात आली. हे भिन्न मत नोंदींमध्ये अंतर्भूत राहील, असेही आयोगाने नमूद केले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारींत निर्दोष करण्याबाबत लवासा यांचे मतभेद होते.