News Flash

पारा ४५.२ अंशावर जाऊनही चंद्रपुरात ६५ टक्के मतदान

४५.२ टक्के तापमान चंद्रपुरात असतानाही मतदारांनी मोठय़ा उत्साहात मतदानाचा हक्क बजावला.

मतदान केंद्रावर लागलेली रांग

चंद्रपूर : विदर्भात सर्वाधिक ४५.२ टक्के तापमान चंद्रपुरात असतानाही मतदारांनी मोठय़ा उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. सहाही विधानसभा मतदारसंघात कोणत्याही अनुचित घटनेशिवाय मोठय़ा प्रमाणात मतदान झाले.  सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६० टक्के मतदान झाले. आणखी एक तासाचे मतदान लक्षात घेता टक्केवारी ६५ पर्यंत राहण्याचा अंदाज आहे. भाजपचे हंसराज अहीर, काँग्रेसचे बाळू धानोरकर व वंचितचे महाडोळे यांच्यासह १३ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे.

सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदार मोठय़ा संख्येने सकाळीच मतदानाला बाहेर पडले. सकाळी ७ ते ९ या दरम्यान ७.३८ टक्के मतदान झाले. सकाळी ११ पर्यंत ही टक्केवारी २० पर्यंत पोहोचली होती. दुपारी १ वाजेपर्यंत ३४ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महिला, तसेच कामावर जाणाऱ्या महिला व पुरुषांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ऊन नसल्यामुळे अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. निवडणूक आयोगाने अपंगासाठी व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करून दिल्याने दिव्यांगही मतदान करण्यासाठी आले होते. अंध मतदारासाठी सुद्धा निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनमध्ये ब्रेल लिपीचा वापर केल्याने त्यांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक अंध उमेदवारांना यापूर्वी मत कुणाला दिले हे कळत नव्हते मात्र, ब्रेल लिपीचा वापर केल्यामुळे उत्साह होता. दुपारी १ वाजताच्या नंतर तापमान ४५.२ अंशावर गेल्याने नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. दुपारी ३ पर्यंत ४६ टक्केमतदान झाले होते, तर सायंकाळी ६० टक्क्यांपर्यंत मतदानाची आकडेवारी गेली होती.

मुंडण करून  बहिष्कार

शहरातील भिवापूर वार्डातील महाकालीनगर व हिराई नगरातील जवळपास ८५० मतदारांनी विकास न केल्यामुळे मुंडण करून सामूहिक बहिष्कार टाकला आहे.  मागील ६० वर्षांपासून लोकप्रतिनिधींनी वीज जोडणी, पिण्याचे पाणी, रस्ता, घरकूल योजना, साफ सफाई तसेच इतर विकास केला नाही. वारंवार लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा करूनही शासन, प्रशासन, महापालिका, नगरसेवक याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे बहिष्कार टाकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 4:53 am

Web Title: voting percentage elections 2019 65 percent voting in chandrapur
Next Stories
1 यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात सरासरी ६० टक्के मतदान
2 शेट्टी यांच्या विजयाची साद शरद पवार घालणार
3 शिंदेच्या काळात मुस्लिम तरुणांना तुरुंगात नाहक सडवले – ओवैसी
Just Now!
X