भारतमाता की जय ही घोषणा मी ऐकतो आहे, मात्र अनेकजण सरकारी मालमत्तेचे नुकसान करतात. अस्वच्छता पसरवतात, देशाच्या स्वातंत्र्याला आता ७५ वर्षे पूर्ण होतील मात्र आपण अजूनही अस्वच्छतेशी लढा देऊ शकलेलो नाही. देशात स्वातंत्र्यलढ्यादरम्यान जे वातावरण होते त्यानंतर ते दिसले नाही. हा माझा देश आहे ही भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वाराणसीमध्ये जाऊन त्यांनी तिथल्या मतदारांचे आभार मानले त्यावेळी भारतमाता की जय ही घोषणा जरूर द्या मात्र देश स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही तुमचीच आहे हे विसरू नका असंही मोदींनी म्हटलं आहे.

स्वच्छतेचं महत्त्व सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उदाहरणही दिलं. स्वतःची गाडी असेल ती २० वर्षे जुनी असेल तरीही तुम्ही ती जपता, स्वच्छ ठेवता. मात्र सरकारी बसमध्ये शेजारी कुणी बसलं नसेल आणि झोप येत नसेल तर सीटमध्ये बोटं घालून त्यातला कापूस बाहेर काढता. बनारसी पान खाऊन पिंक मारता, यात तुम्हाला असं कुठेच वाटत नाही का ही आपली मालमत्ता आहे? ज्या मालमत्तेला सरकारी म्हणून तुम्ही हिणवता त्याचे मालक तुम्ही आहात हे विसरू नका असंही मोदींनी म्हटलं आहे.

देशाने मला पंतप्रधान केले पण काशीतल्या लोकांसाठी मी कार्यकर्ता आहे. मी तुमचा आदेश मान्य केला यापुढेही मी करेन असं म्हणत कार्यकर्त्यांचं समाधान हाच आमचा जीवनमंत्र आहे असं वक्तव्य केलं आहे. काशीतल्या लोकांनी विश्वरूप दर्शन २५ एप्रिल रोजी देशाला घडवलं आणि त्याचा प्रभाव देशावर राहिला असंही मोदींनी म्हटलं आहे. वाराणसीतून उमेदवार म्हणून मी लढत होतो पण काशीतला प्रत्येक घरातला, रस्त्यावरचा माणूस या मतदानात नरेंद्र मोदी होऊन सहभागी झाला म्हणून एवढं यश मिळालं असंही मत मोदींनी व्यक्त केलं. काशीतल्या लोकांनी दिलेल्या आशीर्वादामुळे मी विजयी झालो. मी आज काशीतून बोलत असलो तरीही पूर्ण उत्तर प्रदेशाचं अभिनंदन मला करायचं आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.

आज उत्तर प्रदेश देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणारं राज्य ठरलं आहे. लोकशाहीच्या आधाराला बळकटी देण्याचं काम उत्तर प्रदेशचे लोक करत आहेत याचा मला अभिमान वाटतो आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तर प्रदेशातला मतदार विचार करतो ही गोष्ट माझ्यासाठी खूपच अभिमानास्पद आहे. २०१४, २०१७ आणि २०१९ अशा तीन विजयांची हॅट् ट्रीक उत्तर प्रदेशाने दिली याचा खूपच आनंद वाटतो असंही मोदींनी त्यांच्या भाषणात म्हटलं आहे.

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रचंड मेहनतीमुळे आपल्याला घवघवीत यश मिळालं. योगी आदित्यनाथ यांनीही प्रचंड मेहनत घेतली ज्याचा परिणाम निवडणूक निकालांवर दिसून आला असंही मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान बोलत असताना जय श्रीराम आणि मोदी मोदी या घोषणाही देण्यात आल्या. वाराणसीच्या तमाम जनतेचे आणि मतदारांचे मोदींनी त्यांच्या भाषणात आभार मानले. पक्षाचा कार्यकर्ता असल्याने मी देखील नियमांचे पालन करतो. २५ एप्रिल रोजी मी इथे आलो होतो त्यावेळी काशीने मला विश्वरूप दर्शन घडवलं. ते विश्वरूप दर्शन मला देशासाठी महत्त्वाचं वाटतं. काशीच्या विश्वरूप दर्शनाचा प्रभाव भारतावर पडला यात माझ्या मनात शंकाच नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतमाता की जय या घोषणाही देण्यात आल्या. कार्यकर्त्यांचे समाधान हाच आमचा जीवनमंत्र आहे असं मोदींनी म्हणताच पुन्हा एकदा मोदी मोदी या घोषणा देण्यात आल्या.

२५ एप्रिलला जेव्हा मी इथे आलो होतो त्यावेळी कार्यकर्त्यांनी, भक्तांनी मला आदेश दिला होता की एक महिना तुम्हाला काशीत प्रवेश करू देणार नाही. मग मी काशीविशेश्वराला येण्याऐवजी केदारनाथला गेलो. मी निवडणुकीत आणि प्रचारादरम्यान निश्चिंत होतो कारण तुम्ही सगळ्यांनी केलेले परिश्रम मला ठाऊक आहे. मतदान झाले तेव्हा आणि निकालाच्या दिवशी मी निश्चिंत होतो त्याचं कारण तुम्ही आहात असंही मोदींनी म्हटलं. काशी अविनाशी आहे, या ठिकाणी मला आरोप-्प्रत्यारोपांसाठी लढाई दिसली नाही. मतदारांचा उत्साह दिसून आला. वाराणसीतून उमेदवार म्हणून मी लढत होतो पण काशीतला प्रत्येक घरातला, रस्त्यावरचा माणूस या मतदानात नरेंद्र मोदी होऊन सहभागी झाला म्हणून एवढं यश मिळालं असंही मत मोदींनी व्यक्त केलं.