भगवान मंडलिक

गावात विहिरी, जलकुंभांची कामे; मात्र भूजलपातळी खालावल्याने टंचाई कायम

कल्याण लोकसभेचे खासदार आणि महायुतीचे विद्यमान उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘पंतप्रधान आदर्श दत्तक गाव’ योजनेंच्या माध्यमातून दत्तक घेतलेल्या नागाव गावात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे.  गावातील दोन्ही विहिरींमध्ये पाण्याचा खडखडाट आहे. गावातील प्रशस्त फर्लागभर लांबीचा खोल तलाव पाण्याअभावी खपाटीला गेला आहे.

शिळफाटा-पनवेल मार्गावर दहिसर-मोरी गावापासून मुख्य रस्त्यापासून दोन किमी आतील भागात नागाव आहे. खा. शिंदे यांनी ‘पंतप्रधान दत्तक गाव योजनेच्या माध्यमातून हे गाव दत्तक घेतले. दहिसर मोरीतून नागावकडे जाताना दुपदरी असलेला रस्ता मात्र उत्तम आहे. गाव येण्यापूर्वीच डाव्या बाजूला बेकायदा चाळी दर्शन देतात. स्वागताचे भव्य प्रवेशद्वार वेशीवर आहे. जिल्हा परिषदेची आठवीपर्यंतची स्वच्छ, सुंदर, डिजिटल शाळा याठिकाणी लक्ष वेधून घेते. महानगर गॅसने सामाजिक दायित्व निधीतून शाळेसाठी वास्तू बांधून दिली आहे. खासदारांनी डिजिटल शाळेसाठी संगणक, लॅपटॉप उपलब्ध करुन दिले आहेत. ग्रामपंचायतीची टुमदार वास्तु लक्ष वेधून घेते. दत्तक गाव योजनेच्या माध्यमातून याठिकाणी केली गेलेली विविध विकासकामे लक्ष वेधून घेतात. मात्र, गावातील भिषण पाणी टंचाई ग्रामस्थांना त्रासदायक ठरली आहे. गावाच्या आत प्रवेश करताच तलावाच्या काठावर १० ते १५ महिला ६० ते ७० भांडी घेऊन नळातून बाहेर पडणाऱ्या करंगळीच्या धारेएवढय़ा पाण्याकडे पाहत पाणी भरत असतात. दिवसभर शेतात, भाजी मळ्यात राबून रापलेल्या या महिला पाण्यासाठी पुन्हा नळकोंडाळ्यावर हजर होतात.

‘आमच्या गावाला पाणी टंचाईचा पहिल्यापासून शाप आहे. गावात दोन विहिरी आहेत. त्यांच्यामध्ये पाण्याचा थेंब नाही. एका कुपनलिकेला मध्यंतरी पंप बसविण्यात आला. नळाद्वारे पाणी गावाच्या काही भागात फिरवले जावे असा त्यामागील हेतू. त्यामुळे पूर्वीपेक्षा बरी परिस्थिती आहे. वीजपुरवठा बंद झाला की मात्र अनेक वेळा दोन ते तीन दिवस पाण्यासाठी वणवण करावी लागते. ग्रामपंचायतीने पाण्याचा टँकर विहिरीत ओतला की ते पाणी एक ते दीड तासात संपून जाते’, असे गुणाबाई पाटील या महिलेने सांगितले.

सार्वजनिक कुपनलिका बंद पडली की विहिरीतील झऱ्यातील थेंब थेंब गढूळ पाणी आंघोळ, कपडय़ांसाठी वापरले जाते. गावात जलकुंभ बांधण्यात आला आहे. लगतच्या मोकशा पाडय़ातील एक शेतकरी जलकुंभापर्यंत वाहिन्या टाकण्यासाठी जमीन देत नसल्याने पाणी आणण्याचा प्रश्न रखडला आहे.

या शेतकऱ्याने जमिनीतून वाहिन्या

टाकू नयेत म्हणून न्यायालयातून स्थगिती आणली आहे, असे गावक ऱ्यांनी सांगितले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाच वर्षांपूर्वी गाव दत्तक घेतले. आता गावची पाणी टंचाई दूर होणार असे वाटले होते. गावातील पाणी प्रश्न मात्र कायम आहे, अशी खंत सीता, कमलाबाई पाटील या महिलांनी व्यक्त केली.

‘पाणी द्या..मगच मते देऊ’

‘आता निवडणुका आहेत. मात्र अजूनपर्यंत गावात कोणीही उमेदवार मत मागायला आलेला नाही. जोपर्यंत आम्हाला पुरेसे पाणी मिळत नाही तोपर्यंत मतच कोणाला न देण्याचा निर्धार आम्ही केलाय,’ असे गुणाबाईंनी सांगितले. गावाजवळच्या रस्त्याच्या कडेने पाणी वाहिन्या आणल्या तरी पाणी प्रश्न सुटू शकतो; पण तो निर्णय कोणी घेत नाही. गावात पाणी टंचाई असल्याने बाहेरगावचा कोणीही यजमान आपली मुलगी नागावमधील उपवर तरुणाला देण्यास तयार होत नाही, अशी खंत एका ग्रामस्थाने व्यक्त केली.

सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न

गावात आरोग्य केंद्र नाही. रुग्णांना पनवेल, मुंब्रा किंवा डोंबिवलीत उपचारासाठी जावे लागते. मुख्य रस्त्यापासून गावात येण्यासाठी रिक्षा, खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. पावसाळ्यात, रात्रीच्या वेळेत गावात येताना कसरत करावी लागते.

विकासाचा दावा

खासदारांच्या प्रयत्नामुळे दुर्लक्षित नागाव गावाचा कायापालट झाला, असे काही ग्रामस्थ सांगतात. जलवाहिन्या टाकण्यासाठी जमीन उपलब्ध झाली तर जलकुंभापर्यंत पाणी येऊन पाणी प्रश्न कायमचा मिटेल, असे त्यांचे म्हणणे आहे.