भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतरच आपण बहुमताचा टप्पा गाठला असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांनी बोलावलेल्या बैठकीवरुन खिल्ली उडवत विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी त्यांनी बैठक बोलावली असावी असा टोला लगावला.

‘प्रसारमाध्यमं नेहमी मला तुम्ही किती जागा जिंकणार असं विचारत असतात. मी देशभरातील अनेक भागांमध्ये फिरलो आहे. मला ज्यापद्धतीने लोकांचा प्रतिसाद पहायला मिळाला त्यावरुन पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतरच भाजपाने बहुमताचा टप्पा गाठला असा आत्मविश्वास आहे. सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर भाजपा ३०० जागांचा टप्पा पार करेल आणि एनडीए पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन करेल’, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी पार पडणार आहे. बहुमत मिळवण्यासाठी पक्षाला २७२ जागांची गरज आहे. भाजपाने २०१४ मध्ये २८२ जागा जिंकल्या होत्या.

विरोधकांच्या नियोजित बैठकीवरुन बोलताना अमित शाह यांनी म्हटलं की, ‘अशा बैठकांनी भाजपाला काही फरक पडत नाही. यामुळे भाजपाच्या जागा कमी होणार नाहीत. त्यांनी कदाचित विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी बैठक बोलावली असावी’.