– नामदेव कुंभार

गावातील पाण्याचे भयानक वास्तव पाहून रानमसल्यातील रणरागिणी महिलांनी पुढाकार घेतला आहे. ‘पाणी फाऊंडेशन’अंतर्गत गावात पाणी मुरवण्यासाठी श्रमदानाला सुरूवात केली आहे. दुष्काळाने पछाडलेल्या रानमसले गावातील गावकऱ्यांनी आता पाणी डोळ्यात नाही तर शिवारात आणणार अशी शपथच घेतली आहे. ‘गावातील पुरूषमंडळी पारावर बसून विकासाच्या गप्पा मारतात, प्रत्यक्षात वेळ आल्यावर पुढाकार घेत नाहीत. मग आपण कोणत्या पक्षाला दोष द्यायचा’ अशी कैफियत रानमसल्यातील एका महिलेने व्यक्त केली.

२०१८ साली सोलापूर जिल्ह्यात फक्त ३८ टक्के पाऊस पडला. प्रत्येकवर्षी पडणाऱ्या कमी पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत. आज ना उद्या पाऊस पडेल या आशेवर खरीप हंगामाच्या पेरण्या शेतकऱ्यांनी उरकल्या मात्र पाऊस आलाच नाही. परिणामी शासनाच्या जाहीरातबाजीमुळे पीक विमा तरी मिळेल या आशेने ‘महा ई सेवा केंद्रा’वर जाऊन पिकविम्यासाठी फॉर्म भरला मात्र तिथेही ई सेवा केंद्र चालकांनी मनमानी करत उखळ पांढरे केले. नंतर रब्बी हंगामाची तीच अवस्था. रब्बी हंगामात झालेल्या नुकसानानंतरही पीकविम्याच्या फॉर्म भरला. निम्मा उन्हाळा उलटला तरी पीक विमा नाही, जनावरांसाठी चारा छावणी ही नाही अशी परिस्थीती आहे. दुष्काळ जाहीर होऊन चार महीने सरले तरीही दुष्काळी उपाययोजना शुन्य आहेत. सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांना जनतेकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यांना लोकसभेचं डोहाळ लागलेत. यात मात्र या डोहाळ जेवणात शेतकरी अन् त्याची जनावरं मात्र उपाशीच राहत असल्याची खंत रानमसले येथील काही शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. गाव दुष्काळात आहे. ७२ सारखीच दुष्काळग्रस्त अवस्था होईल असही मत काही ज्येष्ठ गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

पाच ते सहा हजार लोकसंख्या असलेल्या रानमसले गावात पाण्याचं कायम दुर्भिक्ष राहिले आहे. यंदा मात्र ‘पाणी फाऊंडेशन’अंतर्गत स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात गाव पाणीदार करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. ८ एप्रिलपासून मोठ्यांसोबत लहान मुलेही श्रमदानात सहभागी होणार आहेत. श्रमदान करणाऱ्यामध्ये ७० टक्के महिला आहेत. हातात टिकाव, खोरे अन् टोपली घेऊन दुष्काळ मुक्तीचा नारा देत दररोज श्रमदान केले जाते.

गावात पाण्याची समस्या भेडसावत आहे. भविष्यामध्ये अशी समस्या उत्पन्न होऊ नये म्हणून महिला खांद्याला खांदा लावून श्रमदान करत आहेत. घरोघरी शोषखड्डे घेण्यासाठी, झाडे लावण्याचे महत्त्व, माती अडवा पाणी जिरवा, पाणी अडवण्याच्या तंत्रशुद्ध पद्धती, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, कंपोस्ट खत, नाडेप खत, गांडूळ खत यांचे महत्त्व यासाठी गलोगल्ली स्मार्ट टीव्हीवरुन प्रबोधन करण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. एकंदर सध्या जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत असले तरी रानमसलेत मात्र दुष्काळाविरोधात दंड थोपटले आहेत.