भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या विजयाचे तालुक्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले.तालुक्यातील पारनेरसह सुपे,भाळवणी,टाकळी ढोकेश्वर, वडझिरे,अळकुटी,निघोज,जवळा, वाडेगव्हाण येथे फटाके  फोडत,गुलाल उधळत विखे यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.ढोल ताशांच्या गजरात मिठाईचे वाटप करण्यात आले. दरम्यान, विखे यांना तालुक्यातून ३२ हजार मतांचे मताधिक्य मिळाले असल्याचा दावा शिवसेना,भाजपच्या कार्यकर्त्यांंनी केला आहे.

डॉ.विखे विजयी होतील याची खात्री विखे समर्थकांसह भाजप,शिवसेनेच्या तालुक्यातील नेत्यांना,कार्यकर्त्यांना होती, मात्र अनपेक्षितपणे मिळालेल्या प्रचंड मताधिक्याने कार्यकर्त्यांच्या आनंदाला,जल्लोषाला उधाण आल्याचे चित्र आज तालुक्यात होते.

सन २००४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पारनेर विधानसभा मतदार संघाचा समावेश कोपरगाव(नगर उत्तर ) लोकसभा मतदार संघात होता. तोपर्यंत डॉ.विखे यांचे आजोबा बाळासाहेब विखे लोकसभेमध्ये कोपरगाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व करायचे.दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे यांचे तालुक्यावर वर्चस्व होते.त्यांनी त्या वेळी उभारलेली कार्यकर्त्यांची फळी,कार्यकर्त्यांंचा संच तब्बल १५ वर्षांनंतरही टिकून आहे.विखे हाच आपला पक्ष हे मानणारा मोठा वर्ग आजही तालुक्यात आहे हे आजच्या डॉ.विखे यांच्या विजयाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

सन २००५ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पारनेर विधानसभा मतदारसंघाचा समावेश नगर लोकसभा मतदार संघात झाला. त्यानंतर झालेल्या २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार खासदार दिलीप गांधी विजयी झाले.या दोन्ही निवडणुकांमध्ये तालुक्यातील मतदारांनी भरघोस आघाडी दिली.या निवडणुकीत डॉ.विखे यांना मताधिक्य देण्यासाठी विधानसभेचे उपसभापती,आमदार विजय औटी,माजी आमदार नंदकुमार झावरे,पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांच्यासह शिवसेना,भाजपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.