News Flash

‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या नाहीत म्हणून भाजपा कार्यकर्त्याकडून १० वर्षीय मुलाला बेदम मारहाण

मुलाच्या चेहऱ्याला, डोक्यावर आणि पाठीला जखमा झाल्यात

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य: ट्विटर)

पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यातील फूलिया येथे १० वर्षीय मुलाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जय श्री रामची घोषणा देण्यास नकार दिल्याने भाजपा कार्यकर्त्याने या मुलाला मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी दुपारी हा लहान मुलगा चहाच्या दुकानाच्या बाजूने जात असतानाच भाजपा कार्यकर्त्याने त्या अडवून घोषणा देण्यास सांगितलं. मात्र नकार दिल्यानंतर त्याने या मुलाला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.

‘द टेलीग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार मारहाण करण्यात आलेल्या मुलाचे नाव रमेश शर्मा (बदलेलं नाव) असं आहे. रमेश चौथ्या इयत्तेमध्ये शिकतोय. या मारहाणीमध्ये रमेशला गंभीर दुखापत झाली असून त्याला रानाघाट येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय. स्थानिकांनी या मुलाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या चहाच्या टपरीची तोडफोड करत त्याला मारहाण केली. महादेव प्रामाणिक असं या चहाच्या दुकानाच्या मालकाचं नाव आहे. दुकानाची तोडफोड केल्यानंतर स्थानिकांनी राष्ट्रीय महामार्ग १२ वरील वाहतूक अडवून धरत प्रामाणिकला अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणाचे गांभीर्य आणि जनतेचा संताप लक्षात घेता पोलिसांनी कारवाई सुरु केली. पोलिसांनी एक तास प्रयत्न केल्यानंतर महामार्गावरील अडवून धरण्यात आलेली वाहतूक सुरु झाली. पोलिसांनी प्रमाणिकला अटक करण्याचं आश्वासन दिल्यानंतरच स्थानिक रस्त्यातून बाजूला झाले. मात्र स्थानिकांनी द टेलीग्राफला दिलेल्या माहितीनुसार प्रमाणिक फरार झाला आहे. प्रमाणिक हा स्थानिक भाजपा महिला नेत्या अशणाऱ्या मिठू प्रमाणिकचा पती आहे.

पोलीस म्हणतात…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगा हा नाटकामध्ये स्त्री पात्र साकारणाऱ्या कलाकाराचा मुलगा आहे. हा कलाकार तृणमूल काँग्रेसचा समर्थक आहे. मारहाण झाली त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या साक्षीदाराच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा प्रामाणिकच्या चहाच्या दुकानाजवळून जात होता. त्यावेळी प्रमाणिकने या मुलाला हाक मारुन स्वत: जवळ बोलवलं. त्यानंतर प्रामाणिकने या मुलाला त्याच्या वडिलांचा तृणमूलकडे ओढा असण्यावरुन डिवचण्यास सुरुवात केली. १७ एप्रिल रोजी येथे पार पडलेल्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान या मुलाच्या वडिलांनी तृणमूलच्या प्रचारात नोंदवलेला सहभाग प्रमाणिकला खटकल्याने त्याने असं कृत्य केल्याचा अंदाज साक्षीदाराने व्यक्त केलाय. “प्रमाणिकने या मुलाला धमकावण्यास सुरुवात केली आणि जय श्री रामच्या घोषणा देण्यास सांगितलं. मात्र मुलाने त्याला नकार दिला. त्यानंतर प्रमाणिकने या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. अखेर स्थानिकांनी मध्यस्थी करुन या मुलाला प्रमाणिकच्या तावडीतून सोडवलं,” असं साक्षीदाराने म्हटलं आहे.

मुलाने नोंदवला जबाब…

घडलेल्या घटनेमुळे या मुलाला मानसिक धक्का बसला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार प्रमाणिकने जय श्री रामची घोषणा देण्यासाठी जबरदस्ती केली. तसेच प्रमाणिकने माझ्या वडिलांना शिवीगाळ केला. मी या सर्व गोष्टींना विरोध केला असताना त्याने मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने माला कानाखाली मारल्या. त्यानंतर तो मला लाथा मारु लागला. स्थानिकांनी मला वाचवलं, असं या मुलाने पोलिसांना सांगितलं आहे.

भाजपाच्या क्रूर राजकारणाचा चेहरा…

रुग्णालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलाच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि पाठीला दुखापती झाली असून त्याला सीटी स्कॅन करण्यास सांगण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या यूथ विंगचे नेते पीटर मुखर्जी यांनी, “या घटनेमुळे भाजपाचे राजकारण किती क्रूर आहे हे दिसून येत आहे. आई नसणाऱ्या या मुलालाही भाजपाने सोडलं नाही,” असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच या मुलाच्या आईचं निधन झाल्याचं समजते.

मुलानेच पतीला डिवचले…

दुसरीकडे भाजपाच्या महिला नेता आणि आरोपीची पत्नी मिठू यांनी हल्ला झाल्याचं मान्य केलं असलं तरी या मुलानेच पतीला डिवचल्याचा आरोप केलाय. या मुलाने दुकानावर दगडफेक करत दुकानातील काचेची भांडी तोडल्याचा दावा मिठू यांनी केलाय. त्यानंतरच माझ्या पतीने या मुलाला मारहाण केल्याचं मिठू म्हणाल्यात. टीएमसी या प्रकरणावरुन सर्वसामान्यांमध्ये असणारी आमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मिठू यांनी केलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 9:59 am

Web Title: west bangal bjp supporter beat 10 year old boy for not giving jai shree ram slogan scsg 91
Next Stories
1 “हे असं, विकसित गुजरात असेल तर…”; करोना रुग्णालयातील व्हिडीओवरुन ममतांचा मोदी, शाहंना टोला
2 सर्व हिंदूंनी एकत्र यावं आणि भाजपाला मतदान करावं असं आम्ही म्हटलं असतं तर… : मोदी
3 पश्चिम बंगाल : TMC नेत्याच्या घरात सापडल्या EVM मशिन्स; निवडणूक आयोग म्हणतं, “अधिकारी झोपी गेल्याने…”
Just Now!
X