पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रासमोर मतदारांच्या मोठ्या रांगा दिसून येत असतानाच उलुबेरिया येथे एक विचित्र प्रकार समोर आला आहे. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार उलुबेरिया येथे तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरात ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट मशीन्स सापडल्या आहेत. यानंतर निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा टीका होतानाच चित्र दिसत आहे. मात्र सोमवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला असून मंगळवारी होणाऱ्या निवडणुकांचा या मशीन्सशी काहीही संबंध नाही असं निवडणूक आयोगाने सोमवारीच स्पष्ट केलं आहे. मात्र या प्रकरणामध्ये कठोर कारवाई केली जावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केलीय.

“या प्रकरणामध्ये सेक्टर अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. तृणमूल नेत्याच्या घरी आढळून आलेले ईव्हीएम हे रिझर्व्ह म्हणजेच अतिरिक्त ईव्हीएम होते. मात्र आता त्यांचा वापर निवडणुकीसाठी केला जाणार नाही. या प्रकरणामध्ये सर्व दोषींविरोधात गंभीर कारवाई केली जाईल,” असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. याबद्दल अधिक माहिती देताना, “हावडा जिल्ह्यातील विधानसभा श्रेत्र १७७ उलुबेरिया उत्तरमधील सेक्टर १७ येथे निवडणूक अधिकारी असणाऱ्या तपन सरकार यांना अतिरिक्त ईव्हीएमसहीत पाठवलं होतं. मात्र हा अधिकारी आपल्या नातेवाईकाच्या घरी जाऊन झोपी गेल्याने हा गोंधळ झाला. असं करणं हे निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन आहे. त्यामुळेच या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं असून त्याच्यावर कठोर नियमांअंतर्गत कार्यवाही केली जाईल,” असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यात आज ३१ जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. दक्षिण २४ परगना जिल्ह्यामध्ये (भाग २) १६ जागांवर, हावडा (भाग १) येथे सात जागांव आणि हुगळी (भाग १) येथील आठ जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदानाच्या वेळेस करोनासंदर्भातील नियमांची अंमलबजावणी केली जात असून तापमान तपासूनच मतदारांना मतदानासाठी प्रवेश दिला जातोय.

आज मंत्री आशिमा पात्रा, भाजपा नेते स्वप्न दास गुप्ता आणि माकता नेता कांति गांगुलींसहीत २०५ उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. आज पश्चिम बंगालमध्ये एकूण ७८ लाख ५० हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक आयोगाने सर्व विधानसभा क्षेत्रांना संवेदनशील घोषित केलं असून येथे कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.